मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे ब


मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 मुंबई: मुंबई महापालिकेच्या मतदारयादीत (Mumbai Municipal Corporation Election 2025) तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. दुबार नावांमुळे यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेनं आता वेळही मागितला आहे. तसेच एकाच व्यक्तीचे नाव दोनदा-तीनदा नव्हे, तर 103 वेळा मतदारयादीत असल्याची माहिती देखील मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

मुंबईच्या मतदारयादीत दुबारच नव्हे, तर 103 वेळा नाव असलेला मतदार देखील आढळला आहे. मुंबईत तब्बल 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहे. त्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुबार मतदार (Duplicate Voter In Mumbai) असल्याचा केलेला दावा खरा असल्याचं समोर आलं आहे.

दुबार मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवर पोहोचली- (Duplicate Voter In Mumbai)

4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे वारंवार नोंदवली गेल्यानं अशा दुबार मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवर पोहोचली आहे. मात्र, डुप्लीकेट मतदाराचे नाव किती वेळा वारंवार नोंदवले गेले आहे, याची माहिती प्रशासनाकडे नाही. त्यामुळे दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी पालिका प्रशासन विशेष मोहिम हाती घेणार आहे. 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत दुबार मतदार हटवण्यासाठीची मोहिम चालवली जाणार आहे. 24 वॉर्डमधील निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त ही विशेष मोहिम राबवतील.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र- (Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election 2025)

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय मतदारयादी विभाजनातील गंभीर त्रुटी व गोंधळ दूर करून निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूकप्रक्रिया राबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र मिळून निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. निवडणूक आयोगाची मतदार याद्यांमध्ये गोंधळ कायम ठेवण्याची, आणि ते कधीही न निस्तरता, ते गोंधळ अधिक गुंतागुतीचे कसे होतील या बाबतीतलं जे सातत्य आहे त्याचं अभिनंदन करावं का खेद व्यक्त करावा हेच कळत नाही. असो पण पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित घोळ तसाच ठेवला हे परत सिद्ध झालं, असल्याचं म्हटलं होतं.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात काय होतं? (Raj Thackeray Uddhav Thackeray)

1) निवडणूक आयोगाने शेवटची मतदार यादी ही ३०/१०/२०२४ रोजी प्रकाशित केली. त्यानंतर नवीन यादी प्रकाशित झाली नाही. निवडणूक आयोगाच्याच नियमाप्रमाणे दर वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन यादी प्रसिद्ध होते आणि त्यानंतर दर तीन महिन्याला सुधारित यादी प्रसिद्ध होते. या वर्षात असं काही झालंच नाही. का? हे हेतुपुरस्सर होतं असं म्हणलं तर निवडणूक आयोगाला लगेच राग येतो. पणजर ते हेतुपुरस्सर नसेल तर मग कारण काय ?

2) बरं तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर नवीन मतदार नोंदणी, वगळली गेलेली नावं आणि बदल यासह जे प्रसिद्ध केलं आहेत ती फक्त औपचारिकता म्हणून केलं आहेत असं म्हणायला पूर्ण वाव आहे कारण इतका त्याच्यात गोंधळ आहे. कारण नवीन सुधारित यादीत ते कोण आहेत स्त्री का पुरुष ? त्यांचा पत्ता काय ? याचा कोणताही तपशील नाही. बरं जेंव्हा सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ मा. श्री. चोकलिंगम यांना भेटलं होतं तेंव्हा त्यांनी कुठल्याही त्रुटींशिवाय आम्ही याद्या प्रसिद्ध करू आणि तुम्ही दिलेल्या सूचनांचं पालन करू असे सांगितलं मग त्याचं काय झालं?

3) महापालिका निवडणुकांसाठी आधी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख ६ नोव्हेंबर २०२५ ठरली होती आणि ती पुढे ढकलत २० नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली. मुळात तुम्ही गेले १३ महिने मतदार याद्याच प्रसिद्ध केल्या नाहीत, त्यात जी यादी जी आगामी महापालिका निवडणुकांसाठी सगळ्यात महत्वाची आहे ती प्रसिद्ध करून त्यावर हरकती घ्यायला ८ दिवस दिलेत.. हे काय आहे? मुळात तुम्ही प्रसिद्ध केलेल्या याद्या सदोष. त्यात धड कोणती माहिती नाही. बरं राजकीय कार्यकत्यांना त्यावर काम करायचं असेल तर तुम्ही ज्या याद्या प्रसिद्ध केल्यात त्या फक्त वाचण्यास योग्य. मग त्यावर काम करायचं तर त्याच्यावर काही तांत्रिक संस्कार करा त्यालाच काही दिवस लागतात. मुळात या याद्या एडिटेबल फॉरमॅट मध्ये का नाहीत? जग ‘कृत्रिम बुद्धिमत्तेकडे’ निघालेलं असताना, निवडणूक आयोगाच्या कारभारात तांत्रिक विषयांतील ‘जनरल बुद्धिमत्ता’ पण दिसत नाही. असो. ४) बरं, या याद्यांवर अभ्यास करून आक्षेप नोंदवायचे तर त्याची प्रक्रिया पण तुम्ही किचकट करून ठेवली आहेत. अनेक ठिकाणी एका वॉर्डमधले मतदार दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलेत. अनेक इमारती तुम्ही आखून दिलेल्या नकाशाच्या आता मतदार पण पळवायला सुरुवात झाली आहे का ? पलीकडे आहेत, तरीही त्या वॉर्डमध्ये दिसत आहेत. सध्या सत्ताधारी पक्ष उमेदवार पळवत आहेत, त्यातून प्रेरणा घेऊन

5) याद्यांवर काम करून आक्षेप नोंदवताना, आक्षेप घेणाऱ्यानेच त्या मतदाराचा आधारकार्ड किंवा इतरं पुरावा मागितला आहे. हे म्हणजे चुका तुम्ही करायच्या आणि त्या आम्ही दाखवल्या की तुम्ही आमच्याकडे किंवा मतदाराकडे पुरावे मागायचे. वा ! बरं ज्या दुबार मतदारांच्या विषयासाठी आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटत होतो, आणि दुबार नाहीतच असा निवडणूक आयोग तेंव्हा करत होता. त्याच निवडणूक आयोगाने मान्य केलं की जवळपास १० लाख दुबार मतदार आहेत. मग जर इतके मतदार दुबार आहेत त्यांना शोधून, त्यांची नावं वगळण्यासाठी ७ ते ८ दिवस कसे पुरतील? त्यासाठी किमान २१ दिवस हवेत. आक्षेप घेण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास एकत्रित आक्षेप घेण्याची मुभा असली पाहिजे.

6) एकतर निवडणूक आयोगाने २१ दिवस द्यावेत किंवा निवडणूक रद्द करावी. आणि पुन्हा सर्व याद्या सुरळीत करून निवडणुका घ्याव्यात. तुम्ही ५ डिसेंबर २०२५ ला एक यादी प्रसिद्ध कराल आणि नियमाप्रमाणे आम्ही सगळं केले असं सांगून स्वतःच समाधान कराल. पण महाराष्ट्रातील जनतेला हे माहित आहे की तुम्ही अजिबात तुमच्या कामाबाबत प्रामाणिक नाही आहात. तुम्ही स्वतःला स्वायत्त यंत्रणा म्हणवता, मग तुमची स्वायत्तता दाखवाच. एक गोष्ट विसरू नका, तुम्ही पण या राज्याचे नागरिक आहात… आज कोणाच्यातरी मागे घरंगळत जाताना तुम्हाला छान वाटेल… पण ज्यांच्यामागे तुम्ही घरंगळत जात आहात, ती लोकं उद्या तुमच्या नरडीला नख लावतील तेंव्हा तुम्हाला कळेल. तुमच्यात सद्सदविवेक बुद्धी आहे असं आम्ही मानतो, तिचा मान राखा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेऊन तुमची स्वायत्तेतून येणारी शक्ती काय असते ही सत्ताधाऱ्यांना दाखवा. महाराष्ट्राची जनता तुमची शतशः ऋणी राहील.

संबंधित बातमी:

Supreme Court Maharashtra Local Body Election 2025: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आज काय काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.