दक्षिण मुंबईतील 9 हॉटेल्सचे परवाने FDA ने केले निलंबित; चेतना, मियाँ कबाबसह नॅचरल्स आईस्क्रीमवर कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यात अन्न आणि औषधी विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे एक्शन मोडवर आहेत. त्यांनी अन्नात भेसळ करणाऱ्या दक्षिण मुंबईतील 9 रेस्टॉरंटवर धडक कारवाई करत त्यांचे परवाने निलंबीत केले आहेत. यामध्ये तब्बल 80 वर्षे जुन्या चेतना रेस्टॉरंटचा तसेच नॅचरल्स आईस्क्रीम, बेरुट, मियाँ कबाब यांचा समावेश आहे. तपासणीत स्वयंपाकघरातील अस्वच्छता, झुरळे, माशा आणि उंदरांचा प्रादुर्भाव, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक अशा गंभीर त्रुटी आढळल्या.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, FDA च्या पथकाने मंगळवारी दक्षिण मुंबईतील काही रेस्तराँची तपासणी केली. यावेळी मांसाहारी पदार्थांची साठवणूक करताना कच्चे आणि शिजवलेले पदार्थ एकत्र व उघड्यावर ठेवल्याचे आढळले. तसेच भांडी धुण्याच्या ठिकाणी गरम पाण्याची व्यवस्था नव्हती. कर्मचारी अॅप्रन, हातमोजे आणि केस झाकण्यासाठी आवश्यक कॅप न वापरताच काम करत होते. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे, अन्नसुरक्षा प्रशिक्षणाच्या नोंदी, FoSTaC प्रमाणपत्रे आणि अन्नसुरक्षा व्यवस्थापनाशी संबंधित कागदपत्रांचाही उपलब्ध नसल्याचे आढळे.

फोर्ट येथील काळा घोडा परिसरातील सुमारे 80 वर्षे जुन्या चेतना रेस्टॉरंटमध्येही अनेक त्रुटी आढळल्या. अन्नपदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात येणारे कंटेनर अस्वच्छ होते, तर ते गंजलेल्या रॅकवर ठेवण्यात आले होते. फ्रिजचे रबर खराब झाले होते आणि अनेक अन्नपदार्थांवर लेबल लावलेले नव्हते. याशिवाय कीटक नियंत्रणाच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या. जमिनीवर सांडपाणी साचणे, खिडक्यांना जाळ्या नसणे, फरशा फुटलेल्या असणे आणि बुरशी आढळणे अशा समस्याही तपासणीत समोर आल्या.

फोर्ट येथील मियाँ कबाब रेस्तराँमध्ये झुरळे आणि माशांचा प्रादुर्भाव आढळला. कच्चे चिकन योग्य तापमानात न ठेवता उघड्यावर ठेवण्यात आले होते. तर कफ परेड येथील बेरूट रेस्टॉरंटमध्ये उंदीर आणि माशांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ फ्रिज; अस्वच्छ स्वच्छतागृहे आढळली. याशिवाय अनधिकृतपणे मिठाई तयार करण्याचा विभाग सुरू असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. त्यामुळे एफडीएतर्फे तातडीने कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध खाद्यआस्थापनांच्या स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Comments are closed.