मुंबईत शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह; मुंबादेवी मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा
गणेशोत्सवापाठोपाठ अवघ्या काही दिवसांत सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवामुळे मुंबई शहर व उपनगरांत पुन्हा उत्साही आणि चैतन्याचे वातावरण संचारले आहे. रविवारी शारदीय नवरात्रोत्सवाच्या (घटस्थापना) पहिल्या दिवशी प्रसिद्ध मुंबादेवी मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संपूर्ण शहरात हजारो मंडळांमार्फत नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईत गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवाच्या सेलिब्रेशनची रंगत वाढली आहे. मुंबईकर मोठय़ा श्रद्धेने आणि उत्साहाने नवरात्रोत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळेच रविवारी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच मुंबईची आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गर्दी टाळण्यासाठी अनेक मुंबईकरांनी सकाळी लवकर मंदिरात हजेरी लावली होती. भुलेश्वर आणि झवेरी बाजार परिसर भाविकांच्या वर्दळीने गजबजला आहे. अनेक मुंबईकरांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करीत मुंबादेवी मंदिर गाठले होते. दर्शनासाठी कुटुंबीयांसह घराबाहेर पडलेल्या भाविकांमुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनला मोठी गर्दी झाली होती. उपनगरांतही सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे मोठय़ा उत्साहाने नवरात्रीचा सण साजरा करू लागली आहेत.
Comments are closed.