Mumbai News – गोरेगावमध्ये ओबेरॉय मॉलजवळ बेस्ट बसची कारला धडक, दोन प्रवासी जखमी
गोरेगाव पूर्वमध्ये ओबेरॉय मॉलजवळ बेस्ट बसने कारला धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. राजेंद्र मुरलीधर सोनावणे आणि मंगेश रामचंद्र मोडलेकर अशी जखमींची नावे आहेत. यापैकी राजेंद्र सोनावणे हे बेस्टचे अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 5 च्या सुमारास बेस्टच्या ताफ्यातील मातेश्वरी ही कंत्राटी दिंडोशी आगारातून बस भाईंदरच्या दिशेने चालली होती. यादरम्यान ओबेरॉ मॉलसमोरील सिग्नलजवळ बस उड्डाणपुलाखाली वळण घेत असताना बसने खासगी कारला धडक दिली. त्यानंतर बस मेट्रोच्या खांबावर आदळली. यात दोन जण जखमी झाले.
राजेंद्र सोनवणे (58), यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यांना तीन टाके पडले. तर मंगेश रामचंद्र मोडलेकर (57) यांच्या हनुवटीला आणि डोक्याला दुखापत झाली. त्यांना हनुवटीवर एक आणि डोक्यावर पाच टाके पडले. दोन्ही जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
घटनेनंतर लगेचच, मातेश्वरीचे अपघात निरीक्षक कुलकर्णी यांनी दोन्ही जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी ट्रॉमा केअर हॉस्पिटल, जोगेश्वरी (पूर्व) येथे हलवले. या प्रकरणात मदत करण्यासाठी अपघात विशेष निरीक्षक नवले (अपघात विभाग – पश्चिम) यांची नियुक्ती करण्यात आली होती.
अपघातग्रस्त बस बेस्टच्या टोईंग वाहनाद्वारे ओढून नेण्यात आली आणि वनराई पोलीस ठाण्यासमोर उभी करण्यात आली. खासगी कारच्या चालकाने दिलेल्या तक्रारीवरून, बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.