पुण्यात नवले पुलावर अभिनेत्रीसोबत संतापजनक घटना, सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली कठोर कारवाईची मागणी
‘लागिरं झालं जी’ या मालिकेमधून घरोघरी ज्ञात असलेल्या अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर सोबत एक संतापजनक घटना घडली आहे. 12 सप्टेंबला मुंबईहून साताऱ्याला जात असताना पुण्यातील नवले ब्रिजजवळ काही जणांनी कल्याणी यांच्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांची गाडी अडवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील घडलेल्या या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे मागणी सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार कल्याणी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. कल्याणी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, संबंधित व्यक्तीकडून जबरदस्ती करण्याचा देखील प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यातील एक व्यक्तीने कल्याणीचा यांचा हात ओढून त्यांना जबरदस्ती आपल्या गाडीत नेण्याचाही प्रयत्न केल्याचे त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील नवले ब्रीज परिसरात काही गुंडांनी कल्याणी नंदकिशोर या लोकप्रिय अभिनेत्रीची गाडी अडवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. पुण्यात गृहखात्याच्या नाकावर टिच्चून गुंड अशा पद्धतीने नागरीकांना त्रास देण्याचे उद्योग करीत… https://t.co/nwfWuFQiIf
— सुप्रिया सुळे (@supriya_sule) 14 सप्टेंबर 2026
सुप्रिया सुळे यांनी घडलेल्या घटनेवर ‘एक्स’वर पोस्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर त्या म्हणाल्या, पुण्यातील नवले ब्रिज परिसरात घडलेल्या हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. ‘गृह खात्याच्या नाकावर टिच्चून गुंड अशा पद्धतीने नागरिकांना त्रास देण्याचे उद्योग करत आहेत. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे,’ असे सुळे यांनी म्हटले आहे. तसेच, या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन अभिनेत्रीला त्रास देणाऱ्या गुंडांचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी विनंती त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Comments are closed.