जगात शेअर मार्केटमध्ये मोठा भुकंप होणार, लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा गंभीर इशारा
मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेवर दबाव वाढला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होत असून, त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवरही दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ‘रिच डॅड पुअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक बाजारातील घसरणीचा (क्रॅश) इशारा दिला आहे.
कियोसाकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर केलेल्या एका पोस्टमधून हा इशारा दिला. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. याआधीही कियोसाकी यांनी मोठ्या आर्थिक संकटाची शक्यता व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी संभाव्य संकटामागील काही कारणांकडेही लक्ष वेधले आहे.
AIचा वाढता उत्साह, युद्ध आणि कर्जाचा बोजा कारणीभूत?
कियोसाकी यांच्या मते, AI क्षेत्रातील वाढता उत्साह, इराणमधील युद्ध, प्रचंड प्रमाणातील कर्ज आणि निवृत्त होणारी ‘बेबी बूमर’ पिढी ही संभाव्य मोठ्या आर्थिक संकटामागील प्रमुख कारणे ठरू शकतात.
कियोसाकी यांनी त्यांच्या इशाऱ्याची तुलना इतिहासातील ग्रेट डिप्रेशन (महामंदी)शी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मागील मोठी आर्थिक मंदी १९२९ ते १९५४, म्हणजे तब्बल २५ वर्षे चालली होती.
मात्र, या काळातही आर्थिक संकटासाठी आधीपासून तयार असलेल्या काही कुटुंबांसाठी परिस्थिती वेगळी होती. उदाहरण म्हणून त्यांनी केनेडी कुटुंबाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, ग्रेट डिप्रेशनचा काळ तयार असलेल्या लोकांसाठी त्यांच्या आयुष्यातील सर्वांत चांगला काळ ठरला होता.
कियोसाकी यांनी लोकांना संभाव्य संकटाचा बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी तयारी करण्यासाठी अजून थोडा वेळ आहे. सामान्य लोकांना संकटाची जाणीव होऊन घबराट निर्माण झाल्यानंतर बँकांमधून पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड उडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Comments are closed.