कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पक्ष्यांना खायला द्या: देवेंद्र
मुंबई कबूटर खाना: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांच्या विरोधात सुरु केलेल्या कारवाईचा वेग आता मंदावण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नसल्याची भूमिका घेतली. कबुतरखाने (Kabutar Khana) अचानक बंद करण्याऐवजी कबुतरांना कोणत्या वेळेत खाणे द्यावे आणि कोणत्या वेळेत देऊ नये, असा नियम तयार करता येईल. तसेच कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कबुतरखान्याच्या परिसरात पक्ष्यांचा विष्ठेचाही मोठ्याप्रमाणात त्रास जाणवतो. याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. कबुतराची विष्ठा साफ करण्याचे तंत्र आहे, त्याचाही विचार करा. यासंदर्भात माझी मनेका गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे. हायकोर्टात राज्य सरकार आणि महापालिकेने ठाम भूमिका मांडावी. पर्यायी व्यवस्था होईस्तोवर महापालिकेने कबुतरांना कंट्रोल फिडिंग करावे. यासंदर्भात गरज पडली तर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेने नुकताच दादर परिसरातील कबुतरखाना बंद केला होता. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताडपत्री टाकून हा कबुतरखाना पूर्णपणे झाकला होता. त्यामुळे याठिकाणी बसण्याची सवय लागलेल्या कबुतरांना दुसरी जागा उरली नव्हती. परिणामी या कबुतरांनी आजुबाजूच्या इमारती आणि दुकानांच्या छतावर आश्रय घेतला होता. खाणं न मिळाल्यामुळे या काही कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावाही स्थानिकांनी केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कबुतरखाने बंद करु नयेत, या मागणीसाठी पुढाकार घेतला होता. जिथे कमी लोकवस्ती असेल अशा नॅशनल पार्क, आरे कॉलनी आणि महालक्ष्मी रेसकोर्सच्या परिसरात नवीन कबुतरखाने उभारण्यात यावेत, असा प्रस्ताव मंगलप्रभात लोढा यांनी मांडला होता. आम्ही कबुतरांचा मृत्यू होऊन देऊ शकत नाही. त्यांना वाचवणे आमचे कर्तव्य आहे, असेही मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले होते. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मंगलप्रभात लोढा आणि जैन समाजाला काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कबुतरखाने हटवण्यासाठी दीर्घकाळापासून पाठपुरावा करत असलेला मनसे पक्ष या सगळ्यासंदर्भात काय भूमिका घेतो, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
आणखी वाचा
आमच्यावर 100 टक्के टॅक्स लावा, आम्ही भरण्यास तयार; कबुतरखान्यासाठी गुजराती-जैन समाज आक्रमक
आणखी वाचा
Comments are closed.