सांगा, गर्दीतून किती काळ लटकायचे? दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान महिलेची लोकलमधून उडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमधील जीवघेण्या गर्दीचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. डोंबिवली लोकलच्या गेटवर लटकून प्रवास करणाऱया महिलेला तोल सावरणे कठीण झाल्यानंतर तिने लोकलमधून खाली उडी मारली. गुरुवारी सकाळी 7.56 वाजताच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यानच्या वळणावर ही धक्कादायक घटना घडली. लोकल सिग्नलवर थांबली असताना हा प्रकार घडला. त्यामुळे महिलेच्या जिवावरचा धोका टळला. तथापि, प्रवाशांनी आणखी किती काळ गर्दीतून लटकायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मध्य रेल्वेवर सकाळच्या पीक अवर्सला अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेकडील लोकल ट्रेनला खचाखच गर्दी होते. लागोपाठ एसी लोकल गेल्यानंतर येणाऱ्या साध्या लोकलला प्रवाशांना अक्षरशः रुळाच्या दिशेने झुकून लटकत प्रवास करावा लागतो. गुरुवारी सकाळी 7.56 वाजताच्या डोंबिवली लोकलला भयंकर गर्दी झाली होती. गर्दीत फूटबोर्डवर पाय ठेवणेही मुश्कील झाल्यानंतर प्रवासी महिलेने लोकलमधून रुळावर उडी घेतली. ती रुळावर पडल्याचा व्हिडीओ काही प्रवाशांनी सोशल मीडियात शेअर केला. त्यानंतर सामान्य लोकलचे कायमचे विस्कळीत वेळापत्रक आणि गर्दी नियंत्रणातील रेल्वे प्रशासनाच्या अपयशावर चौफेर टीकेची झोड उठली आहे. या घटनेबाबत ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत कोणतीही नोंद झालेली नाही, मात्र पोलीस सध्या व्हायरल व्हिडीओच्या सहाय्याने संबंधित महिलेचा शोध घेत आहेत. महिलेने रुळावर उडी मारल्यानंतर तिला दुखापत झाली का? तिला कोणी ढकलले की गर्दीच्या रेटारेटीत खाली पडली? याचा तपास करण्यासाठी पोलीस महिलेची माहिती मिळवत असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. या घटनेने गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला असून आम्ही आणखी किती काळ गर्दीतून लटकत प्रवास करायचा, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. राजकारण्यांच्या मुलांसाठी डिफेंडर आणि तुमच्या मुला–मुलींनी मात्र ट्रेनमधून पडून मरायचे, अशी संतप्त प्रतिक्रिया मुंबई रेल प्रवासी संघाचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी नोंदवली.

  • गेल्या वर्षी मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी स्वयंचलित दरवाजाच्या साध्या लोकलची घोषणा केली. प्रत्यक्षात ती लोकल अद्याप प्रवासी सेवेत दाखल झाली नसून प्रशासन एसी लोकल फेऱयांची संख्या हळूहळू वाढवत आहे. त्यामुळेच साध्या लोकलमध्ये तुडुंब गर्दी होऊन ती सामान्य प्रवाशांच्या जिवावर बेतत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.

Comments are closed.