Mumbai News – चेष्टा केल्याचा संशयातून दुकानदारावर चाकूने हल्ला, पोलिसांकडून आरोपीला अटक
आपली चेष्टा करत असल्याच्या संशयातून एकाने दुकानदारावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील आग्रीपाडा परिसरात घडली. या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. फिरोज मन्सुरी असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, आग्रीपाडा येथील बेबी गार्डन परिसरात पीडित दुकानदार आणि त्याचा भाऊ दुकानात एकमेकांसोबत गप्पा मारत हसत होते. फिरोजला वाटले दोघे आपलीच चेष्टा करून हसत आहेत. याच समजातून फिरोजने पिशवीतून चाकू काढला आणि एका भावावर हल्ला केला. या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेला. पोलिसांनी कसून शोध घेत आरोपीला काही तासातच बेड्या ठोकल्या. आरोपीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत.
Comments are closed.