मंत्रालयातील रेकार्डिंग स्टुडिओला वाळवी; कोट्यवधी रुपयांचे नुकसान
मंत्रालयाच्या तळमजल्यावर असलेल्या रेकार्डिंग स्टुडिओला पूर्णपणे वाळवी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाळवी लागल्यामुळे संपूर्ण स्टुडिओचे लाकडी प्लोअरिंग, गालिचा आणि खुर्च्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आठ ते दहा वर्षांपूर्वी एक कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा स्टुडिओ बांधण्यात आला होता. वाळवीमुळे हा सर्व खर्च वाया गेला असून आता नव्याने स्टुडिओची उभारणी करण्यात येणार आहे.
मंत्रालयाच्या इमारतीला वाळवीची लागण झाली आहे. त्यामुळे इमारतीचे मोठे नुकसान होत आहे. त्याचा फटका मंत्रालयातील अनेक कार्यालयांना बसला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वाळवी नष्ट करण्यासाठी औषध फवारणी केली जाते, पण तरीही वाळवीचा उपद्रव कायम असल्याचे सांगण्यात येते. आता या वाळवीने माहिती व जनसंपर्क विभागाच्या अखत्यारीतील रेकार्डिंग स्टुडिओचा घास घेतला आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर या स्टुडिओची उभारणी करण्यात आली होती. शासकीय अधिकाऱयांच्या तसेच मंत्र्यांच्या मुलाखतींचे रेकार्डिंग या स्टुडिओमध्ये होते. जय महाराष्ट्र कार्यक्रमाचे रेकार्डिंगही या स्टुडिओमध्ये होते, पण या स्टुडिओला वाळवी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर स्टुडिओतील सर्व गालिचे, खुर्च्या बाहेर तळमजल्यावरच्या व्हरांडय़ात काढून ठेवण्यात आल्या. फ्लोअरिंगचे लाकूड आणि लाकडी पार्टिशन बाजूला काढल्यावर आतमध्ये प्रचंड वाळवी दिसून आली आहे. आता सर्वप्रथम वाळवी नष्ट करण्याचे औषध मारण्यात येणार आहे. पण रेकार्डिंग स्टुडिओमधील गालिचा व अन्य सामान हलवल्यानंतर बाहेर आलेली वाळवी अन्य कार्यालयांमध्ये घुसून महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान करण्याची भीती मंत्रालयातील कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
ऑडिटमध्ये कामावर ताशेरे
या स्टुडिओच्या कामावर एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला होता असे समजते. या खर्चावर तेव्हा महालेखापालांनी आक्षेप घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या स्टुडिओची उभारणी का केली नाही असाही आक्षेप महालेखापालांनी घेतला होता असे सांगण्यात येते. त्यामुळे आता या स्टुडिओच्या उभारणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होणार का याकडे मंत्रालयीन कर्मचाऱयांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.