मुंबईत कलिंगडच्या विक्रीत मोठी घट, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यानंतर लोकांमध्ये भिती

मुंबईतील पायधुनी परिसरात एका दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलींचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा पसरली असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा थेट परिणाम कलिंगड विक्रीवर झाला असून, अनेक विक्रेत्यांनी विक्रीत मोठी घट झाल्याचे सांगितले आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

क्रॉफर्ड मार्केटमधील फळ विक्रेते अल्लाउद्दीन यांनी सांगितले की, या घटनेनंतर कलिंगड विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. काही इतर विक्रेत्यांनीही भीतीमुळे विक्री कमी झाल्याचे मान्य केले, मात्र त्यांनी नाव जाहीर करण्यास नकार दिला. जवळच्या एका ज्यूस सेंटर मालकानेही कलिंगड ज्यूसच्या ऑर्डर्समध्ये सुमारे 50 टक्क्यांनी घट झाल्याचे सांगितले.

असे असले तरी काही विक्रेत्यांनी खप कमी झाला नसल्याचे म्हटले आहे. अब्दुल रहीम नावाच्या विक्रेत्याने सांगितले की, त्याच्या व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. “लोक अजूनही कलिंगड खात आहेत, आम्हीही खातो,” असे तो म्हणाला. शहेंशहा नावाच्या दुसऱ्या विक्रेत्यानेही नियमित ग्राहकांनी कलिंगड विकत घेतल्याचे सांगितले.

दरम्यान, पायधुनीपासून सुमारे 3 किमी अंतरावरील भायखळा फळ बाजारात मात्र बहुतांश विक्रेत्यांना कलिंगड विक्रीत तोटा सहन करावा लागत आहे. काही ग्राहकांनी आधी घेतलेले कलिंगड परत आणल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे लोकांमध्ये भीती वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

राज्य अन्न व औषध प्रशासन (FDA) अधिकाऱ्यांनाही तपासात अडचणी येत आहेत. घटनेनंतर पायधुनी परिसरात कलिंगड विक्रेते सापडत नसल्याचे त्यांनी सांगितले. “असा प्रकार यापूर्वी कधी पाहिलेला नाही. कलिंगड किंवा बिर्याणी-टरबूज एकत्र खाल्ल्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याची कोणतीही नोंद सापडलेली नाही,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

गूढ अधिकच वाढले

अब्दुल्ला दोकाडिया (40), त्यांची पत्नी नसीम (35) आणि मुली आयेशा (16) व झैनब (13) यांचा मृत्यू होऊन चार दिवस उलटले तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी काही तासांपूर्वी त्यांनी कलिंगड खाल्ले होते. उलट्या सुरू झाल्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र काही तासांतच चौघांचाही मृत्यू झाला.

जेजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरसे यांनी सांगितले की, ही लक्षणे सामान्य अन्न विषबाधेसारखी नाहीत. अशा प्रकारे अचानक आणि गंभीरपणे प्रकृती खालावण्याची लक्षणे फूड पॉईसनिंगमध्ये सहसा दिसत नाही. यात कोणत्यातरी विषारी किंवा रासायनिक घटकाचा संशय आहे,” असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

राज्य FDA चे अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे-पाटील यांनीही कलिंगडातील कीटकनाशक अवशेषांमुळे मृत्यू होण्याची शक्यता नाकारली. “कलिंगडावर विविध कीटकनाशके वापरली जातात, पण त्यामुळे मृत्यू होत नाही,” असे त्यांनी सांगितले.

डॉक्टरांनी अफवा फेटाळल्या

डॉक्टरांनी ‘बिर्याणी खाल्ल्यानंतर टरबूज खाल्ल्यास धोका’ या सोशल मीडियावरील दाव्यांना वैज्ञानिक आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले की, कलिंगड कापून बराच वेळ उघडा ठेवल्यास, दूषित पाण्याने धुतल्यास किंवा अस्वच्छ सुरीने कापल्यास त्यात जीवाणू वाढू शकतात. काही विक्रेते चव वाढवण्यासाठी साखरेचे पाणी इंजेक्ट करतात, त्यामुळेही कलिंगड दुषित होऊ शकते.

अशा दूषित टरबूजामुळे अतिसार, उलट्या, पोटदुखी, गॅस यांसारखी लक्षणे 30 मिनिटांपासून 4 तासांच्या आत दिसू शकतात. मात्र, अशा प्रकारचे प्रकरण सहसा जीवघेणे नसते, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

Comments are closed.