तलावांमध्ये तीन वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा, मुंबईची मदार राखीव कोट्यावर, वाढीव पाण्यासाठी सरकारला पत्र

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांतील जलसाठा सध्या 11,93,647 दशलक्ष लिटरपर्यंत खाली आला आहे. तीन वर्षांचा विचार करता यंदाचा जलसाठा सर्वात कमी आहे. यंदा पावसानेही सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे उन्हाळ्याअखेर मोठय़ा पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने सरकारच्या अखत्यारीतील भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव जलसाठय़ाची मागणी पत्राद्वारे केली आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 4100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांना वर्षभर पुरेसे पाणी मिळण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी सातही धरणांत मिळून 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. यावेळी उपलब्ध पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाते. मात्र या वर्षी तलावक्षेत्राही पावसाने ओढ दिल्याने पालिकेसमोर पाणी पुरवठय़ाच्या नियोजनाचे आव्हान निर्माण झाले आहे. यातच राज्य सरकारने पालिकेला पुढील वर्षीचा 31 ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पालिकेने आताच राज्य सरकारकडे राखीव पाणी देण्याची मागणी केली आहे.

धरणांतील सध्याचा जलसाठा

  • अप्पर वैतरणा – 2,10,653 दशलक्ष लिटर
  • मोडक सागर – 63,862 दशलक्ष लिटर
  • तानसा – 1,14,913 दशलक्ष लिटर
  • मध्य वैतरणा – 1,59,575 दशलक्ष लिटर
  • भातसा – 6,12,545 दशलक्ष लिटर
  • विहार – 25,228 दशलक्ष लिटर
  • तुळशी – 6872 दशलक्ष लिटर
  • एकूण –  11,93,647 दशलक्ष लिटर

8 ऑक्टोबरची स्थिती

2026 – 11,93,648

दशलक्ष लिटर

2025 – 13,74,941

दशलक्ष लिटर

2024 – 13,28,654

दशलक्ष लिटर

गतवर्षी पालिकेला भातसातून 147092 दशलक्ष लिटर, तर अप्पर वैतरणा धरणातून 9200 हजार दशलक्ष लिटर पाणी मिळाले होते. मात्र या वर्षी पाण्याची कमतरता पाहता पालिकेने राज्य सरकारकडे किमान 10 ते 20 टक्के वाढीव पाण्याची मागणी केली आहे. त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मेअखेरीस किमान पाणीकपात 20 टक्क्यांपर्यंत करण्याची वेळ आल्यानंतर राखीव कोटा वापरण्यास सुरुवात केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Comments are closed.