राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे आपटी बार! तटकरे म्हणतात, दादांनी मला तारीखही सांगितली होती
ऐन दिवाळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे आपटी बार फुटतच आहेत. 12 फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, अजित पवार यांनी ती तारीख दिलीच होती, असा पुनरुच्चार खासदार सुनील तटकरे यांनी आज केला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र विलीनीकरणाची शक्यता धूसर असल्याचे सांगत केवळ राजकीय रंग देऊन हा विषय चघळला जातोय असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून शनिवारी डिस्चार्ज दिल्यानंतर ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक नेते आणि पदाधिकारी त्यांची भेट घेत आहेत. या भेटीगाठीनंतर विलीनीकरणाच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
शरद पवारांना 11 तारखेला भेटणार – प्रफुल्ल पटेल
शरद पवारांना रुग्णालयात भेटल्यानंतर काय चर्चा झाली याबद्दल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आज पुन्हा बोलले. शरद पवार यांच्यासोबत विशेष काही चर्चा झालेली नाही. आपण दिवाळीनिमित्त गोंदिया येथे जात असून 10 तारखेपर्यंत परत येऊ असे शरद पवार यांना सांगितले म्हणून ते 11 तारखेला भेटू असे म्हणाले होते, त्यानुसार 11 तारखेला त्यांना भेटण्याचा प्रयत्न राहील, असे पटेल यांनी सांगितले.
भाजपसोबत जायचे असेल तर विलीनीकरण अशक्य
भारतीय जनता पक्षासोबत जायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण पूर्णपणे अशक्य आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली स्वतंत्र ओळख आणि अस्तित्व कायम ठेवणार आहे. भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेणे आम्हाला मान्य नाही आणि ते महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांच्या विपरीत आहे, असेही ते म्हणाले. पक्षाला स्वावलंबी ठेवून शरद पवारांच्या नेतृत्वाखालीच वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पार्थ पवार सलग दोन दिवस सिल्व्हर ओकवर
पार्थ पवार यांनी शनिवारी आणि आज अशी सलग दोन दिवस शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवेळी तिथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार जितेंद्र आव्हाड हेसुद्धा उपस्थित होते. दीड तास पार्थ तिथे होते.
Comments are closed.