मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरले; कर्मचाऱ्याला अटक, किती रुपये घेतले?
मुंबई : सिद्धिविनायक मंदिरातील (Temple) कर्मचाऱ्याला दानपेटीतून पैसे चोरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर मंदिर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील एका कर्मचाऱ्याला दानपेटीतून पैसे चोरल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून त्यानंतर दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्यानंतर, आरोपीला न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्याला पोलीस (Police) कोठडी सुनावली आहे. तसेच, यापूर्वीही त्याने अनेकवेळा पैसे चोरल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.
राजेंद्र पेंडुरकर (वय 57) असे या आरोपीचे नाव असून तो लोअर परळ परिसरातील रहिवासी आहे. त्याच्यावर दानपेटीतून सुमारे 10,000 रुपये चोरल्याचा आरोप आहे. मात्र या प्रकरणात आणखी काही कर्मचारी सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून अधिक तपास सुरू आहे. तक्रारदार हा मंदिरातच कार्यरत असून शुक्रवारी CCTV फुटेज तपासत असताना पेंडुरकर दानपेटीतून पैसे चोरताना दिसले. यानंतर तक्रारदार यांनी याची माहिती तत्काळ वरिष्ठांना दिली. मंदिर ट्रस्टने मागील 8 ते 10 दिवसांचे CCTV फुटेज तपासले असता आरोपी वारंवार दानपेटीतून पैसे चोरत असल्याचेसमोर आले. त्यानंतर ट्रस्टने दादर पोलिसांशी संपर्क साधून अधिकृत तक्रार नोंदवली. पोलीस तपासादरम्यान आरोपीने फक्त 10,000 रुपये चोरल्याचे कबूल केले आहे. मात्र, वारंवार चोरी केल्याच्या संशयामुळे एकूण रक्कम अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याबाबत सखोल तपास दादर पोलिस करत आहे.
मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर हे भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान असून दररोज हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. देशातील राजकीय दिग्गज नेते, सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सही मंदिरात दर्शनासाठी आवर्जुन येत असतात. काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीरने मंदिरात येऊन ट्रॉफीसह दर्शन घेतले होते. त्यामुळे, मंदिरातील सुरक्षा बंदोबस्त चोख असतो. तरीही, मंदिरातील कर्मचाऱ्यानेच तिजोरीतील दानपेटीवर डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.