मुंबईतून परराज्यांसाठी गाड्या सोडण्याचा धडाका, एलटीटीहून बंगळुरूसाठी विशेष एक्स्प्रेस धावणार
महाराष्ट्रातील बंद केलेल्या राज्यांतर्गत रेल्वेगाडय़ा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली थंड बस्त्यात असताना रेल्वेने मुंबईतून परराज्यांसाठी विशेष गाडय़ा सोडण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. रेल्वे प्रशासनाने रविवारी बंगळुरूसाठी विशेष एक्प्रेसची घोषणा केली. ही गाडी आठवडय़ातून दोनदा लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते बंगळुरू अशी धावणार आहे. 19 मेपासून ही गाडी प्रवासी सेवेत धावणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दादर-रत्नागिरीसह अनेक गाडय़ांना मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म आणि वेळेची उपलब्धता नसल्याचे कारण दिले. संबंधित तांत्रिक मुद्दे पुढे करीत राज्यांतर्गत गाडय़ा सोडण्याबाबत रेल्वे प्रशासनाची टाळाटाळ सुरू आहे. याचदरम्यान परराज्यांसाठी मात्र विशेष गाडय़ा, नियमित गाडय़ा सोडल्या जात आहेत. रविवारी दक्षिण-पश्चिम रेल्वेने एसएमव्हीटी बंगळुरू ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीची घोषणा केली. ही 17 डब्यांची गाडी दक्षिण हिंदुस्थानच्या प्रवाशांसाठी सोडण्यात आली आहे. परराज्यांतर्गत गाडय़ांचे नियोजन करतानाच महाराष्ट्रातील बंद केलेल्या गाडय़ा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधी करीत आहेत. मात्र त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने राज्यातील प्रवासी संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रातील प्रवाशांना दुय्यम वागणूक का?
मुंबईतून परप्रांतात जाणाऱ्या अनेक नवीन गाडय़ा सुरू होत आहेत. त्या गाडय़ांना मुंबईतील मुख्य स्थानकांवर हक्काची जागा मिळतेय. पण कोकणात जाणाऱया गाडय़ा मुंबईबाहेर, दिव्यापर्यंतच मर्यादित का ठेवल्या जातात?, महाराष्ट्रातील लोकांना आपल्याच राज्यात दुय्यम वागणूक का मिळतेय, असा संतप्त सवाल प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी केला.
Comments are closed.