म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? आर्थिक नुकसान कसं टाळायचं?

म्युच्युअल फंड नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून शेअर बाजारात मोठी अस्थिरता असल्यानं मुच्युअल फंड गुंतवणूकदारांना अपेक्षेप्रमाणं परतावा मिळालेला नाही. शेअर बाजारातील घसरणीमुळं बहुतांश म्युच्युअल फंडचा परतावा शून्य झाला आहे.  अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमधून अपेक्षेप्रमाणं परतावा मिळत नसल्यानं  काय करावं असा विचार करत आहेत. म्युच्युअल फंड संदर्भातील निर्णय घेताना चुका करु शकतात. त्या चुकांमुळं मोठं नुकसान होऊ शकतं, हे नुकसान टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना कोणत्या चुका टाळाव्यात?

बाजारातील घसरणीवेळी एसआयपी थांबवणं : जेव्हा युद्ध किंवा आर्थिक मंदीच्या बातमीमुळं शेअर बाजार घसरतो तेव्हा बहुतांश गुंतवणूकदार भीतीमुळं एसआयपी बंद करतात. हीच सर्वात मोठी चूक असते. जेव्हा शेअर बाजारात घसरण होत असते तेव्हा एसआयपीमध्ये अधिक यूनिट मिळतात. ज्याला रुपी कॉस्ट अवरेजिंग म्हटलं जातं. जेव्हा बाजारात पुन्हा तेजी येते तेव्हा या यूनिटसमधून तुम्हाला अधिक नफा मिळतो.

चांगली कामगिरी करणाऱ्या फंडच्या मागं धावणे: बहुतांश गुंतवणूकदार 3 ते 5 वर्षांचा परताा पाहून कोणत्यातरी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. एखाद्या फंडानं काही वर्ष चांगला परतावा दिला आहे तो पुढील वर्षी चांगला परतावा देईल असं सांगता येत नाही.  फंडनं दिलेला रिटर्न किंवा जुना परतावा न पाहता, त्याची क्वालिटी पाहून गुंतवणूक केली पाहिजे.

NAV च्या घसरणीला घाबरणे: अनेकदा म्युच्युअल फंडच्या NAV ची किंमत कमी झाली म्हणजे तुमचे पैसे बुडाले असं होत नाही. ही बाजारातील अस्थायी स्थिती असते. मात्र, कमी किमतीवर अनेक यूनिटस खरेदी करण्याची संधी मिळते.

योग्य वेळेची वाट पाहणे : शेअर बाजारात केव्हा घसरण होईल आणि शेअर बाजारात कधी तेजी येईल हे जगभरातील मोठे मोठे दिग्गज देखील सांगू शकत नाहीत. त्यामुळं योग्य वेळेची वाट न पाहता सातत्यानं गुंतवणूक करत राहणं आवश्यक आहे. बाजारात घालवलेला वेळ, बाजाराचं टायमिंग महत्त्वाचं असतं.

सर्व पैसे एकाच योजनेत गुंतवणे : अनेकदा बहुतांश गुंतवणूकदार सर्व रक्कम एकाच म्युच्युअल फंड योजनेत गुंतवतात. जर, त्या फंडनं चांगला परतावा दिला नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं एक समजूतदार गुंतवणूकदार म्हणून आपले पैसे वेगवेगळ्या योजनेत गुंतवणं आवश्यक आहे.

कोणत्याही ध्येयाशिवाय गुंतवणूक : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ध्येय निश्चित न करता निर्णय घेणं चुकीचं ठरू शकतं. मुलांच शिक्षण, निवृत्तीचं प्लॅनिंग अशा ध्येयांशिवाय गुंतवणूक करणं चुकीचं ठरू शकतं. ध्येय निश्चित न करता गुंतवणूक केल्यास तुम्ही मध्येच पैसे काढू शकता.  त्यामुळं तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. यासाठी मुच्युअल फंड निवडण्यापूर्वी वित्तीय ध्येय निश्चित केलं पाहिजे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.