चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रनाग मंदिरात नागपंचमीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी
संपूर्ण राज्यात आज नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नागपंचमीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती शहरातल्या भद्रनाग मंदिरात देखील हजारो भाविकांनी दर्शनासाठी आज पहाटेपासूनच गर्दी केली आहे.
हे भद्रनाग मंदिर हे राज्यातलं एकमेव नागाचं मंदिर असून या ठिकाणी 9 फण्यांच्या नागाची मूर्ती विराजमान आहे. हे मंदिर किमान एक हजार वर्ष जुनं असून हे मंदिर विदर्भातील नाग पूजेची साक्ष देणारं सर्वात प्रमुख स्थळ आहे. या नाग मंदिरावर हजारो भक्तांची निस्सीम श्रद्धा असून महाराष्ट्रासह तेलंगाना, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून हजारो भक्त आज दर्शनासाठी भद्रनाग मंदिरात येतात.
पहाटे नागदेवतेची विशेष पूजा आणि अभिषेक करून दिवसाचा प्रारंभ करण्यात आला. भद्रावती नगरी म्हणजे प्राचीन इतिहास, श्रद्धा, स्थापत्यकला आणि आख्यायिकांचा अनोखा संगम आहे. मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच प्राचीन वास्तूची भव्यता आणि भक्तीचे वातावरण मनाला वेधून घेते. मंदिराची खरी ओळख केवळ श्रद्धेपुरती मर्यादित नाही. ११४६ सालचा शिलालेख, हेमाडपंथी स्थापत्य, गूढ शेषशायी मूर्ती, ५१ पायऱ्यांची नागकुंडासारखी विहीर या मंदिराचे गूढ अधिकच गडद करते. शेकडो वर्षापासून नागपंचमीनिमीत्त हजारो भाविक येथे दर्शनाला येतात.
Comments are closed.