चार वर्षीय चिमुकला रात्रभर अंगणवाडीत कोंडला गेला, खेळता खेळता खोलीत गेला, तिथेच झोप लागली अन्..
नागपूर बातम्या: नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील खापरखेडा भागात निष्काळजीपणामुळे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बोरकर लेआऊट येथील अंगणवाडीत चार वर्षीय चिमुकला रात्रभर कोंडला गेल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने तो सकाळी सुरक्षित अवस्थेत आढळून आला आहे.
Nagpur News: नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षीय चिमुकला संध्याकाळच्या सुमारास खेळत खेळत अंगणवाडीच्या मागील बाजूच्या खोलीत गेला. खेळता खेळता त्याला तिथेच झोप लागली. दरम्यान, अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे शाळा बंद करताना सर्व खोल्यांची व्यवस्थित पाहणी न करता कुलूप लावले. त्यामुळे मुलगा आतच राहिला.
Nagpur News: कुटुंबीयांची रात्रभर धावपळ
सायंकाळी मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. परिसरात चौकशी, नातेवाईकांकडे संपर्क अशा सर्व शक्यता पडताळूनही त्याचा पत्ता लागला नाही. परिस्थिती गंभीर बनल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. तक्रारीनंतर पोलिसांनी नियमानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने 7 पथके तयार केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, अवतीभवतीच्या भागात शोधमोहीम राबवण्यात आली.
Nagpur News: सकाळी उघडले कुलूप आणि समोर आले चित्र
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणवाडी उघडण्यात आली असता आत वेगळेच चित्र दिसले. मुलगा अंगणवाडीत सुरक्षित अवस्थेत आढळून आला. रात्रभर तो खोलीतच अडकून होता. सुदैवाने त्याला कोणतीही शारीरिक इजा झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी शाळा व अंगणवाडी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. शाळा बंद करताना प्रत्येक खोलीची काटेकोर तपासणी करणे आवश्यक असून, अशा प्रकारची निष्काळजीपणा पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.