नागपुरात पोलिसच करतायत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन; कागदपत्रांची कमतरता अन्…वाहतूक पोलीस उपा

नागपूर: वाहन चालवताना बऱ्याच वेळा आपण वाहतूक कायद्याचं (Traffic) उल्लंघन करतो. मग वाहतूक पोलीस (Traffic Police) आपली गाडी अडवतात आणि आपल्याला दंड (Fine) भरायला सांगतात. आपण तो दंड भरतो आणि पुन्हा आपल्या प्रवासाला लागतो. मात्र, नागपुरात पोलिसच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याची बाब समोर आली आहे, पोलीस विभागाच्या अनेक वाहनांमध्ये पीयूसी आणि इन्शुरन्स संदर्भातल्या कागदपत्रांची पूर्तता नाही. सामान्य नागपूरकरांना दंडात्मक कारवाई करणारे वाहतूक पोलीस स्वतःच्या विभागाच्या या प्रकाराकडे लक्ष घालणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

PUC तसेच इन्शुरन्सच्या नियमांची पूर्तता नाही…

सामान्य वाहन चालकांच्या वाहनात “पॉल्युशन अंडर कंट्रोल” म्हणजेच पीयूसी किंवा इन्शुरन्स संदर्भातील कागदपत्रांची कमतरता असल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र हीच स्थिती जर पोलिसांच्या वाहनांसंदर्भात असेल आणि ते वाहन राजरोसपणे रस्त्यांवर धावत असेल, तर तुम्ही काय म्हणणार? हे सर्व घडतंय उपराजधानी नागपुरात… जनता फाउंडेशनशी जोडलेल्या काही दक्ष नागरिकांमुळे नागपूर पोलिसांच्या अनेक वाहनांमध्ये पॉल्युशन अंडर कंट्रोल म्हणजेच PUC तसेच इन्शुरन्सच्या नियमांची पूर्तता नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

त्यामुळे कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच नियमांची पूर्तता न करता नियम भंग केले जात असल्याचे चित्र आहे. एबीपी माझाने पोलिसांच्या वाहनातील नियमांचा असा उल्लंघन नागपूरचे वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या निदर्शनास आणून दिले. परिवहन विभागाच्या ॲपवर जर पोलीस वाहनांसंदर्भात अशी माहिती असेल, तर आम्ही आमच्या वाहनांची तातडीने तपासणी करू आणि खरंच पीयूसी आणि इन्शुरन्स संदर्भातील नियमांचा उल्लंघन होत असेल, तर योग्य कारवाई करू असे वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणाले आहेत. दरम्यान, हे प्रकरण उचलून धरणाऱ्या जनता फाउंडेशनने पोलिसांच्या सर्व वाहनांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

नागपूर पोलिसांच्या वाहनांमध्ये PUC संदर्भात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप आहे..

* Mh 31 FU 2042 (गिट्टीखदान पोलीस स्टेशनचे वाहन) – PUC प्रमाणपत्र 5 may 2023 पासून नाही..

* Mh 31 FX 5343 (सदर पोलीस स्टेशन चे वाहन ) – 17 मार्च 2025 पासून PUC प्रमाणपत्र नाही…

* Mh 31 DZ 0412 (वाहतूक पोलिसांचे टोईंग वॅन) – PUC आणि इन्शुरन्स नाही..

* Mh 31 CV 0121 (वाहतूक पोलिसांचे टोईंग वॅन) – PUC नाही…

*अशाच स्वरूपात गुन्हे शाखा, सीताबर्डी पोलीस स्टेशन, लकडगंज पोलीस स्टेशन मधील अनेक पोलीस वाहनानांच्या कागदपत्रांसंदर्भात कमतरता असून हे वाहन नागपूरची कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी दिवस-रात्र रस्त्यांवर धावत आहे…

आणखी वाचा

Comments are closed.