नागपूर दंगलीबाबत पोलिसांना महत्त्वाचा क्लू सापडला, बांगलादेशमधील फेसबुक अकाऊंटवरुन नेमका काय मे
नागपूर: नागपुरात सोमवारी उसळलेल्या हिंसाचाराच्या आधी आणि नंतर सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांचा सायबर सेल कारवाई करत आहे. अशी अनेक सोशल मिडिया खाती आणि त्यांचा वापर करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाईही केली जात आहे. बुधवारपर्यंत 6 एफआयआर नोंदविण्यात आले होते, परंतु आता नागपूर पोलिसांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणे, चिथावणी देणे याप्रकरणी एकूण 10 एफआयआर नोंदवले आहेत. नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने बांगलादेशातून चालवलेले फेसबुक खाते ओळखले आहे, ज्याने नागपुरात मोठ्या प्रमाणात दंगल भडकवण्याची धमकी दिली होती. ही धोकादायक पोस्ट एका बांगलादेशी युजरने केली असून त्यात त्याने लिहिले की, सोमवारची दंगल ही एक छोटीशी घटना होती आणि भविष्यात आणखी मोठ्या दंगली होतील.
बांगलादेशशी कनेक्शन
हे सोशल मिडिया खाते चालवणारी व्यक्ती बांगलादेशातील रहिवासी असून त्याने हा मेसेज बांगलादेशातून पोस्ट केल्याचे तपासात समोर आले आहे. सायबर सेलने फेसबुकशी संपर्क साधून ते खाते ब्लॉक करण्याची विनंती केली आहे. सोशल मीडियाचा वापर केवळ द्वेष पसरवण्यासाठी होत नसून त्याद्वारे अफवाही पसरवल्या जात आहेत. गेल्या दोन दिवसांत दंगलीत जखमी झालेल्या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचा दावा अनेक पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. सायबर सेलने आतापर्यंत अशा 97 पोस्ट शोधल्या आहेत ज्या चुकीची माहिती पसरवत होत्या. सायबर सेलने लोकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावरील कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका.
नागपूर शहर पोलिसांनी दंगलीत सहभागी असलेल्यांना पकडण्यासाठी आणि ओळखण्यासाठी 18 विशेष तपास पथके (एसआयटी) तयार केली आहेत. आतापर्यंत, पोलिसांनी 200 लोकांना ओळखले आहे आणि आणखी 1,000 संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. दंगलीच्या वेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे संशयित कैद झाले आहेत. या फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे लवकरच आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पोलिस पथके तयारीत आहेत. नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 90 जणांना अटक करण्यात आली आहे. औरंगजेबाच्या पुतळ्यावरील हिरव्या चादरवरती काय लिहिले आहे हे समजून घेण्यासाठी मौलाना आणि तज्ञांची मदत घेण्यात आली आहे. चादरवरती कोणतेही धार्मिक शब्द किंवा विधाने नव्हती. अशा प्रकरच्या चादर तज्ञ आणि धर्मगुरू यांना दाखविण्यात आले आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणी नागपूर पोलिसांचे वेगवेगळे पथक तपासाच्या वेगवेगळ्या दिशेने काम करत आहेत. आतापर्यंत 90 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र दंगलखोर अजूनही लपून बसले आहेत. त्यांची ओळख पटवण्यासाठी नागपूर पोलिसांचा सायबर सेल कामाला लागले आहे. सायबर सेल उपलब्ध सीसीटीव्ही, मोबाईल फुटेज, मीडिया फुटेज, सोशल मीडिया पोस्ट, सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून दंगलखोरांची ओळख पटवून त्यांचा डाटा बेस तयार करत आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
नागपुरमधील महाल परिसरात एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्यांच्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार (सोमवारी, ता, 17) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला आहे. याचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झाला आहे. शहराच्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. पोलिसांनी महाल-गांधी गेटकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर ‘बॅरिकेडींग’ करून मार्ग बंद केले आहेत. त्याचबरोबर या भागातील शाळांना सुट्टी आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जमावबंदी केली आहे.
उपयुक्तांवर केला कुऱ्हाडीने हल्ला
जमावाने एका उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला केला असून इतरांवर दगड व इतर वस्तू फेकल्याने अनेक पोलीस व नागरिक जखमी झाले. त्यापैकी दोन उपयुक्तांसाह एकूण 22 जण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये पोलीस उपायुक्त झोन 5 निकेतन कदम, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) शशिकांत सातव यांच्यासह एकूण 15 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर 2 अग्निशमन दलाचे जवान आणि 5 नागरिकांनाही जखमी अवस्थेत तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले गेले. दरम्यान निकेतन कदम यांना कुऱ्हाडीचे दोन घाव लागले असून जखम खोल असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर शशिकांत सातव यांच्या पायावर रॉडने हल्ला केल्याची डॉक्टरांची प्राथमिक माहिती आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.