Nanded News चंद्रकांत शिंदे मृत्यू प्रकरणी तीन आरोपींना अटक, खूनाचा गुन्हा दाखल
दहा हजारांच्या कर्जासाठी नांदेडमध्ये चंद्रकांत शिंदे शेतकऱ्याचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. फायनान्स कंपनीतच या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच आपल्या माणसाचा घातपात करून त्यांच्या गळ्याला फास लावल्याचा गंभीर आरोप मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना नांदेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल सकाळी मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील चंद्रकांत दगडोजी शिंदे (४०) यांनी नांदेडच्या खालसा फायनान्समधून दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीने सारखा तगादा लावला होता. गुरुवारी सायंकाळी त्याला फायनान्सच्या दोन कर्मचार्यांनी मोटारसायकलवर आणून कार्यालयात डांबले. त्याला मारहाण केली. त्यातच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून त्याची हत्या असल्याचा आरोप केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी वेगवेगळ्या टीम कार्यरत केल्या. केवळ २४ तासात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी जयकुमार उर्फ शेरा भगवान गायकवाड रा. गोपालचावडी, शेख अमेर शेख साहेब हुसेन रा.देगलूर नाका आणि इम्रान खान शाहबाज खान रा.गोवर्धनघाट या तिघांना अटक करण्यात आली आहे. वजिराबाद पोलिसांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई केली. या तिघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज जबरदस्तीने कर्ज वसुली करणार्या खाजगी कंपन्या व मायक्रो फायनान्स कंपन्यांविरुध्द कडक कारवाईचे निर्देश एक बैठक घेवून केले. कर्जाच्या वसुलीसाठी कोणी तगादा लावत असेल तर तात्काळ त्याबाबत तक्रार करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Comments are closed.