नांदेड हादरलं ! गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली घटना
नांदेड क्राईम न्यूज : नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. माहूर तालुक्यातील पाचोन्दा शिवारात आज दुपारी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना दोन सख्ख्या जावांचा अज्ञात संशयिताने गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंतकलाबाई अशोक अडागळे (वय 60) आणि अनुसयाबाई साहेबराव अडागळे (वय 45) असी मृत महिलांची नावे आहेत.
दोघींच्या अंगावरील दागिने किंवा रोख रक्कम गायब असल्याचीही माहिती
या दोन्ही महिला दुपारच्या सुमारास अंदाजे 3 ते 3.30 वाजताच्या दरम्यान आपल्या शेतात कापूस वेचत होत्या. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला करून दोघींच्या गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळी काही ठिकाणी धक्काबुक्कीचे चिन्हे आढळल्याने, हा प्रकार केवळ खून नसून लूटमारीचा प्रयत्न असावा, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दोघींच्या अंगावरील दागिने किंवा रोख रक्कम गायब असल्याचीही माहिती काही स्थानिकांकडून पुढे आली असून, पोलिसांकडून याची पडताळणी सुरू आहे.
या घटनेमुळं माहूर तालुका हादरला
सदर गुन्ह्यामुळे माहूर तालुका हादरला असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिशय शांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचोन्दा परिसरात असा दुहेरी हत्येचा प्रकार प्रथमच समोर आल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगाने तपास सुरू असून, ही घटना लूटमारीशी संबंधित आहे की कोणत्या वैयक्तिक वैमनस्यातून घडली, याचा तपास गतीने सुरू आहे. पुढील तपास माहूर पोलीस करत आहेत.
अकोला जिल्ह्यातही धक्कादायक घटना, तरुणीचा जळालेला मृतदेह आढळला
अकोला (Akola) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील धनेगाव शेतशिवारात आज संध्याकाळच्या सुमारास भीषण प्रकार उघडकीस आला आहे . पोलीस पाटील प्रमोद लांडे यांच्या शेताच्या लगत सुमारे 30 ते 32 वर्षीय अज्ञात युवतीचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. युवतीच्या अंगावर एकही कपडा नसल्यामुळे आणि परिसर निर्जन असल्याने, ही युवती इतरत्र ठार करुन येथे आणून टाकण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. युवतीची ओळख अद्याप पटलेली नाही, तर या प्रकरणाचा तपास बाळापूर पोलीस करत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.