‘आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणार’; खरगे यांच्या वक्तव्याला मोदींचे प्रत्युत्तर – TMarathiNews

बसानकांठा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाला मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहणार आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांवर अफवा पसरवून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

गुजरातमधील बसानकांठा जिल्ह्यातील भिलडी येथे भारत बोवाइन ब्रीडिंग अँड रिसर्च सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. तसेच सुमारे 14 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करण्यात आली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 25 ऑक्टोबर रोजी बिहारचे पहिले मुख्यमंत्री श्रीकृष्ण सिंह यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त पाटणा येथे आयोजित कार्यक्रमात भाषण केले होते. यावेळी एका कार्यकर्त्याने ‘मोदी कुठेच जाणार नाहीत’ असे म्हटले. त्यावर प्रतिक्रिया देताना खरगे यांनी ‘मोदींचा बापदेखील जाईल’ असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण जनतेच्या सेवेत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही लोकांना देश अडचणीत असताना आनंद होतो, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.

इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी खतांचा तुटवडा आणि एलपीजी उपलब्धतेबाबत अफवा पसरवल्याचा आरोप मोदी यांनी केला. शेतकऱ्यांना खते मिळणार नाहीत, एलपीजीचा पुरवठा होणार नाही, अशा अफवा पसरवून मोदी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ते म्हणाले.

शेतकरी कल्याणाला सरकारचे प्राधान्य

केंद्र सरकारने सातत्याने शेतकरी कल्याणाला प्राधान्य दिले असून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवल्याचा दावा मोदी यांनी केला. जागतिक अनिश्चिततेमुळे खतांच्या किमती वाढल्या असल्या, तरी त्याचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडू दिला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 4.5 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

9.34 कोटी शेतकऱ्यांना 24 वा हप्ता

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या हप्त्याअंतर्गत देशातील 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारकडून एकूण 18 हजार 690 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत.

Comments are closed.