धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेंना त्रास देण्याचं काम केलंही असेल, भाजप नेते नरेंद्र पाटलांचा आरोप
नरेंद्र पाटील: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुनच रचण्यात आल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिलेली, अडीच कोटींची डील झाल्याचंही पाटील यांनी म्हटलं होतं. याच प्रकरणावर भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांना त्रास देण्याचे काम धनंजय मुंडे करु शकतात आणि त्यांनी केलंही असेल असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले नरेंद्र पाटील?
बीडमध्ये काय होते मला माहिती आहे. मराठा समाजाच्या विरोधात व्यासपीठावर जाऊन धनंजय मुंडे यांनी भाषणं केली आहेत, ते आम्ही बघितले आहे. बंजारा, ओबीसी समाजाच्या कार्यक्रमात मुंडे यांनी काय भाषणे केले ते आम्ही बघितले आहे. जरांगे पाटील यांना त्रास देण्याचे काम धनंजय मुंडे करू शकतात आणि त्यांनी केलेही असेल असे मत नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.
बीड जिल्हा, मराठवाड्यात उपोषणाच्या माध्यमातून जरांगे पाटील यांनी आंदोलन केली आहे. पाटील झुकतही नाहीत आणि वाकतही नाहीत हे लक्षात आले आहे. काही आंदोलनात धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेले ही वस्तुस्थिती असल्याचे नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराडचा सहभाग आहे. वाल्किम कराड आणि धनंजय मुंडे यांची मैत्री आहे. दरम्यान, यासर्व परिस्थितीत जरांगे पाटील यांनी सांगितले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री नक्की चौकशी करतील. हे खरंच असेल तर काही जण कोणाचा कसा कार्यक्रम करायचा यात तरबेज आहेत असेही नरेंद्र पाटील म्हणाले.
अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही गंभीर आरोप
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे पोर्टल छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या सांगण्यानुसार महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख यांनी जाणीवपूर्वक बंद ठेवल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. अजित पवारांकडे काही मागितलं तरीही त्यांना पैसे मागण्यांसाठी आलो असे वाटते, त्यामुळे ते कायम चिडचिड करतात अशी टीकाही पाटील यांनी केली. एक महिन्यापासून पोर्टल बंद असल्याने 15 हजार मराठा तरुणांचे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या माध्यमातून पोर्टल बंद पडण्याचे कट कारस्थान केले जात आल्याचा दावा नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला असून मराठा समाज उपसमीतीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना माहिती देण्यात आल्याचे नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महामंडळाच्या नावाने तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये बँकेत ठेवले जातात, त्यामुळे व्याजाचा परतावा न करता बँकेत पैसे पार्क करून आधीकरी याचा फायदा होतो असा संशय नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला असून त्याची चौकशी करण्याची मागणी ही केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.