मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळां
नरहरी झिरवाळ लाच प्रकरण: मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात लाच घेताना एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले होते. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मंत्रालयातील आपल्या कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना सापडल्यामुळे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) अडचणीत आले होते. याप्रकरणात विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच कारवाईलाही वेग आला आहे. (Maharashtra Politics News)
या सगळ्या प्रकरणी लाच घेणारा कर्मचारी राजेंद्र ढेरिंगे याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी एसीबीने राजेंद्र ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील घराची झडती घेतली. या घरातून एसीबीच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आता आणखी नवीन माहिती समोर येणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
राजेंद्र ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी आहे. वर्षभरापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभाग येथे तो प्रतिनियुक्तीवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. दरम्यान, आता राजेंद्र ढेरिंगेच्या घरातून एसीबीच्या हाती जी कागदपत्रे लागली आहेत त्यामुळे चौकशीला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. आज ही कागदपत्रं न्यायालयासमोर सादर केली जाऊ शकतात. तेव्हा एसीबीचे अधिकारी एखादी स्फोटक माहिती न्यायालयात सांगणार का, हे बघावे लागणार. राजेंद्र ढेरिंगे याच्या लाचखोरीचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून अज्ञातवासात असलेल्या मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हालचालींनाही वेग आल्याची माहिती आहे. नरहरी झिरवळ यांचा फोन सध्या स्वीच ऑफ आहे. ते आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नरहरी झिरवळांच्या प्रकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच नरहरी झिरवळ लवकरच आपली बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे.
Narhari Zirwal latest news: या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले तर मी राजीनामा देईन: नरहरी झिरवळ
माझ्या विभागातील क्लार्क लाच प्रकरणात सापडला ही माझीही जबाबदारी आहेच, ही जबाबदारी नाही म्हणून चालणार नाही. त्याने जे कृत्य केलंय, त्या कृत्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि चौकशीत जर या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत आले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन,” अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी दिली होती.
आणखी वाचा
मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
आणखी वाचा
Comments are closed.