NSG मध्ये नारी शक्तीचा उच्चांक
पहिल्यांदाच सुरू झाले महिला कमांडो प्रशिक्षण : 12 आठवड्यांपर्यंत चालणार कसून तयारी
वृत्तसंस्था, मानेसर
देशात दहशतवाद विरोधात लढण्याच्या तयारीत आता महिलांची भूमिका आणखी वाढणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजेच एनएसजीने महिला कर्मचाऱ्यांसाठी एक खास प्रशिक्षण सुरू केले आहे. मानेसर येथील एनएसजी प्रशिक्षण अकॅडमीत पहिला महिला कमांडो प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू झाला असून राज्य पोलीस विभाग आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.
हा प्रशिक्षण कार्यक्रम 12 आठवड्यांपर्यंत चालणार असून याचा उद्देश महिला कर्मचाऱ्यांना कठिण अभियानांसाठी तयार करणे आहे. महिला कर्मचाऱ्यांना आवश्यक तांत्रिक अन् अभियानात्मक कौशल्यही शिकविण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान शस्त्रास्त्र हाताळण्याचे धडे देण्यात येतील तसेच सामरिक कारवाईचेही प्रशिक्षण मिळणार आहे. ओलिसांना वाचविणे आणि दहशतवादविरोधी अभियानांशी निगडित इतर विशेष जबाबदाऱ्यांची तयारी महिला कर्मचाऱ्यांना करावी लागेल.
कमांडो प्रशिक्षण कार्यक्रम
-पहिल्यांदाच महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरू झाला आहे हा विशेष कार्यक्रम
-राज्य पोलीस अन् केंद्रीय सशस्त्र दलाच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश
-एनएसजीकडून प्रशिक्षणाचा कालावधी 12 आठवडे ठेवण्यात आला आहे
-शस्त्रास्त्र हाताळणी, सामरिक कारवाईचे प्रशिक्षण महिलांना मिळणार
विविध दलांना मिळणार लाभ
या पुढाकाराचा उद्देश केवळ महिला कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत क्षमता वाढविणे नाही. याच्या माध्यमातून विविध सुरक्षा दलांपर्यंत एनएसजीच्या विशेष दहशतवादविरोधी प्राविण्यालाही पोहोचविण्यात येणार आहे. प्रशिक्षणामळे विविध दलांमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षित महिला कर्मचाऱ्यांची व्याप्ती वाढणार आहे. यामुळे प्रोफेशनल कामकाजाच्या समान मापकांना प्रोत्साहन मिळेल. सुरक्षा दलांदरम्यान परस्पर ताळमेळ देखील मजबूत होणार असल्याचे एनएसजीचे सांगणे आहे.
स्वत:च्या दलांमध्ये नेणार अनुभव
प्रशिक्षण पूर्ण केल्यावर महिला कर्मचारी स्वत:च्या दलांमध्ये परतणार आहेत. स्वत:च्या दलामध्ये प्रशिक्षणादरम्यान शिकलेले कौशल्य आणि अभियानात्मक माहितीचा वापर त्या करू शकतील. यामुळे विविध संस्थांची तयारी मजबूत होईल, दहशतवादाला सामोरे जाण्याची क्षमता देखील व्यापक स्तरावर वाढणार आहे. देशाच्या विविध सुरक्षा दलांमध्ये विशेष प्रशिक्षणाचा लाभ पोहोचू शकेल अशी अपेक्षा एनएसजीला आहे.
ऑपरेशनल भूमिका
हा पुढाकार केवळ सुरक्षा जबाबदाऱ्यांमध्ये महिलांची संख्या वाढविण्यापुरती मर्यादित नाही. याचा मोठा उद्देश महिलांना अभियानात्मक क्षमतेद्वारे सशक्त करणे आहे. प्रशिक्षणानंतर महिला कर्मचाऱ्यांना कठिण आणि विशेष जबाबदाऱ्यांसाठी तयार केले जाइंल. महिला कर्मचारी अंतर्गत सुरक्षेच्या बदलत्या आव्हानांना हाताळण्यास प्रभावी भूमिका बजावू शकतील असे एनएसजीचे सांगणे आहे.
Comments are closed.