तू माझी प्रेयसी झाली नाही तर परमेश्वराचा कोप होऊन तुझा नवरा मृत्युमुखी पडेल…; भीती घालून अशोक

नाशिक : नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन याला अटक केली आहे, काल त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. अशोक खरात (Ashok Kharat)  हा लोकांचे भविष्य सांगत होता, त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते, स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) या भोंदू बाबा विरोधात एका महिलेने फिर्याद दिली आहे, स्वतः कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास संपादन करून त्याने ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला देऊन अत्याचार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे.(Nashik Crime News)

तू माझी प्रेयसी बनून राहिली नाही, तर तुझ्यावर…

तर नाशिकमधील भोंदूबाबा संशयित अशोक खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात नोव्हेंबर २०२२ साली पीडिता विधीबाबत चर्चा करण्यासाठी एकटी गेली होती. यावेळी बाबाने ही संधी साधून कार्यालयातील चेंबरमध्ये बोलावून घेतले. प्रसाद म्हणून पेढा खाण्यास दिला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात असलेले पाणी पाजले. त्यामुळे पीडितेला गुंगी आली आणि डोकं जड झालं. यावेळी बाबाने तिच्यासोबत जवळीक साधत ‘तू माझी प्रेयसी बनून राहिली नाही, तर तुझ्यावर परमेश्वराचा कोप होईल आणि तुझा होणारा नवरा मृत्युमुखी पडेल, मी तुला एकप्रकारे पवित्र करीत आहे…’ असे सांगून भीती घालून जबरदस्ती करून शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तुझे श्रीमंत घराण्यात लग्न होईल…

तर अशोक खरात याच्यासोबत पीडितेची ओळख २०१९ साली कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात झाली होती. त्यावेळी सोबत तिचे दाजीदेखील होते. ‘मला दैवीशक्ती प्राप्त असून, त्या शक्तीच्या सामर्थ्याने मी तुझ्या आयुष्यात असलेले अडथळे दूर करतो. तुझे श्रीमंत घराण्यात लग्न होईल, तुझे करिअरदेखील घडेल, त्यासाठी तुला माझ्याकडे येऊन काही विधी कराव्या लागतील…’ असे सांगून तिचा विश्वास मिळवला होता.

पुन्हा २०२१ साली पीडितेचा साखरपुडा गावाकडे झाला. नंतर तो मोडला तेव्हा खरात बाबाने पुन्हा धीर देत ५० हजार रुपये रोख घेत ‘पुष्कराज’चा खडा दिला. ‘हा खडा ‘सिद्ध’ करून दिला असून, तो पुन्हा गळ्यात घालण्यास सुरुवात कर, तुझे कल्याण होईल…’ असे सांगितले. २०२२ साली दुसऱ्यांदा तिला लग्नाचे स्थळ आले आणि पीडितेचा साखरपुडा होऊन लग्नसोहळाही पार पडला. लग्नाची बातमी खरात यास सांगितली, त्यानंतर त्याने जोडीने आशीर्वाद घेण्यासाठी पीडितेला कार्यालयात बोलावून घेतले आणि पुन्हा त्याच पद्धतीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.