कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
नाशिक निवडणूक निकाल 2026 : नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान (Nashik Election 2026 Voting) शहरात विविध ठिकाणी तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. पैसे वाटपाचे आरोप, उमेदवाराच्या गाडीत सापडलेली रोकड, किरकोळ वादातून झालेली झटापट अशा तब्बल तेरा घटना घडूनही एकाही प्रकरणात गुन्हा दाखल न झाल्याने आता नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) गेल्या काही महिन्यांपासून ‘कायद्याचा बालेकिल्ला’ ही विशेष मोहीम राबवली असतानाही कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गुरुवारी (दि. 15) नाशिक महानगरपालिकेच्या 1,563 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं. यंदा नाशिकमध्ये 56.76 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2017 मध्ये हेच मतदान 61.60 टक्के होतं. म्हणजेच यंदा सुमारे 5 टक्क्यांची घट दिसून आली आहे. मतदानाचा टक्का कमी असला तरी राजकीय वातावरण मात्र तापलेलं पाहायला मिळालं.
Nashik Election Results 2026 : तक्रारी नसल्याने गुन्हा दाखल नाही
मतदानादरम्यान सिडको, नाशिकरोड आणि पंचवटी परिसरात विशेष गदारोळ झाला. काही ठिकाणी पैसे वाटल्याचे आरोप झाले, तर एका उमेदवाराच्या गाडीतून रोख रक्कम मिळाल्याच्या चर्चांनी खळबळ उडवून दिली. या घटनांनंतर कार्यकर्ते आमनेसामने आले, घोषणाबाजी झाली, तर काही ठिकाणी किरकोळ वादही झाले. मात्र कोणत्याही पक्षाकडून किंवा नागरिकांकडून अधिकृत तक्रार दाखल न झाल्याने पोलिसांनी एकाही प्रकरणात गुन्हा नोंदवला नाही. नाशिक पोलिसांनी निवडणूक काळात कडक बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, गस्त पथकं आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत होती. तरीही प्रत्यक्षात घडलेल्या घटनांनंतर कारवाईचा अभाव का दिसून आला. या निवडणुकीत 31 प्रभागांतील 122 जागांसाठी 735 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 527 उमेदवार विविध राजकीय पक्षांचे, तर 208 अपक्ष उमेदवार आहेत. 2017 च्या तुलनेत यंदा राजकीय चुरस अधिक तीव्र आहेत.
Nashik Election Results 2026 : अति-संवेदनशील भाग पोलिसांच्या रडारवर
दरम्यान, आज होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पुन्हा कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अति-संवेदनशील भाग पोलिसांच्या रडारवर असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. नाशिक महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी 63 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं असून, मतदानादरम्यानच्या घटनांप्रमाणेच निकालानंतरचं वातावरणही तितकंच संवेदनशील ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.