भाजप नेता बंडखोराला अर्ज माघारी घेण्यासाठी सोबत घेऊन गेला, पण प्रवेशद्वारात पाच मिनिटांतच खेळ
नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026: नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Mahanagarpalika Election 2026) पार्श्वभूमीवर पंचवटी (Panchavati) विभागात अर्जमाघारीच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या क्षणी मोठे राजकीय नाट्य घडले. माघारीस अवघे पाच मिनिटे शिल्लक असताना माजी नगरसेवक रुची कुंभारकर (Ruchi Kumbharkar) यांना माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांचे पुत्र मच्छिंद्र सानप (Machhindra Sanap) यांनी अर्जमाघारीसाठी पंचवटी विभागीय कार्यालयात आणले. मात्र, प्रवेशद्वारातच घडलेल्या गोंधळामुळे अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण चित्र बदलून गेले.
कुंभारकर यांना प्रवेशद्वारातून आत नेत असतानाच त्यांच्या एका समर्थकाने अचानक मोठ्याने आरडाओरड सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कुंभारकर मागे फिरले. मात्र, वेळ हातातून निसटत चालल्याने काही क्षणांतच पुन्हा तातडीने निवडणूक कक्षाकडे धाव घेतली. तथापि, ते कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वीच अर्जमाघारीची वेळ संपली. दरम्यान, कुंभारकर यांनी यापूर्वीच माघारीचा अर्ज दाखल केला होता. मात्र, त्या अर्जावर सूचक आणि अनुमोदकांच्या सह्या नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज बाद ठरविला. परिणामी, रुची कुंभारकर यांची उमेदवारी अपक्ष म्हणून कायम राहिली.
Nashik Mahanagarpalika Election 2026: भाजपने उमेदवारी नाकारल्याने केला होता अपक्ष अर्ज
अर्जमाघारीच्या अखेरच्या दिवशी दिवसभर शांत वातावरणात प्रक्रिया सुरू असताना, शेवटच्या पाच मिनिटांत पंचवटी विभागीय कार्यालयात मोठा गोंधळ उडाला. प्रभाग क्रमांक तीनमधून भाजपने उमेदवारी नाकारल्याने कुंभारकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यानंतर माजी नगरसेवक मच्छिंद्र सानप यांनी स्वतः पुढाकार घेत कुंभारकर यांना निवडणूक कक्षात नेण्याचा प्रयत्न केला.
Nashik Mahanagarpalika Election 2026: कार्यकर्त्याचा प्रवेशद्वारावर प्रचंड गोंधळ
त्याच वेळी कुंभारकर यांच्यासोबत आलेल्या एका कार्यकर्त्याने प्रवेशद्वारावर प्रचंड गोंधळ घातला. त्याला शांत करण्यासाठी कुंभारकर मागे वळले. तोपर्यंत माघारीसाठी केवळ काही मिनिटेच उरली होती. त्यामुळे सानप यांच्या कार्यकर्त्यांनी कुंभारकर यांच्यासह वेगाने निवडणूक कक्षाकडे धाव घेतली. मात्र, वेळ संपताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे दरवाजे बंद करण्याचे आदेश दिले. त्या वेळी कुंभारकर हे जिन्यातच होते.
Nashik Mahanagarpalika Election 2026: वेळ संपल्याने अधिकाऱ्यांकडून दरवाजा उघडण्यास नकार
कार्यकर्त्यांनी त्यांना आत प्रवेश देण्याची विनंती केली. मात्र, वेळ संपल्याने अधिकाऱ्यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. ध्वनिक्षेपकावर माघारीची वेळ संपल्याची घोषणा होताच कुंभारकर माघारी फिरले. पत्रकारांनी माघारीबाबत विचारणा करताच त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता तातडीने तेथून काढता पाय घेतला. नंतर कुंभारकर यांनी आपण कोणत्याही दबावाला बळी पडलो नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आपल्यावर कोणतेही दबाव तंत्र वापरण्यात आले नसल्याचा दावा करत, आता आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घडामोडींमुळे पंचवटीत सानप गटासमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.
Nashik mahanagarpalika Election 2026: अर्जमाघारीनंतर नाशिक महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट
नाशिक महापालिका निवडणुकीत अर्जमाघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले असून, 122 जागांसाठी तब्बल 729 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपकडून सर्वाधिक 118 जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून 102 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 42 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून 79, मनसेकडून 30, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून 30 तर काँग्रेसकडून 22 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून 55 उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय अपक्ष व इतर पक्षांचे एकूण 212 उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. आजपासून (दि. 03) नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असून, तब्बल 729 उमेदवार आपले भवितव्य आजमावणार आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.