भाजपने नाशिकमध्ये 100 प्लसचा नारा देताच काँग्रेसही मैदानात, महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार

नाशिक नगरपालिका निवडणुका: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2025) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना नाशिक महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महायुतीकडून भाजपने (BJP) शंभर पारचा नारा दिला आहे. महायुतीनंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress) पक्षाने देखील शहरात स्वबळाचा नारा दिला आहे.

कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल आणि त्यामुळे पक्षश्रेष्ठींना भेटून उमेदवारांची चाचपणी पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. आता काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे : आकाश छाजेड

आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीकरता काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. ही निवडणूक पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची आहे. या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल, असे वक्तव्य आकाश छाजेड यांनी नुकत्याच झालेल्या नाशिक शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आहे. काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुकीकरता तयार आहे. पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो काँग्रेसचे कार्यकर्ते निष्ठेने पाळतील, असे देखील आकाश छाजेड यांनी सांगितले आहे.

प्रभाग निहाय बैठका घेऊन लवकरच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. अर्ज छाननी समिती कुठल्याही निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास सातभाई यांनी व्यक्त केलाय. काँग्रेसचा विचार हा लोकांमध्ये रुजलेला आहे. कुठल्याही अफवा व भीतीवर विश्वास न ठेवता काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडणूक लढतील आणि सत्ता काँग्रेसशिवाय कोणी स्थापित करणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल दिवे यांनी म्हटले आहे. तसेच, देशामध्ये परिवर्तनाची लाट आहे. त्यामध्ये नाशिक शहर कुठे मागे राहणार नाही. लोकांच्या रोजच्या समस्यांकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. निवडणुकीमध्ये जनता आपल्याबरोबर राहील, असे मत प्रदेश काँग्रेसचे सचिव ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Nashik News : नाशिकमधील राड्याचं प्रकरण तापलं! भाजपच्या माजी नगरसेवकाला तत्काळ अटक करा, अन्यथा…; ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट इशारा

आणखी वाचा

Comments are closed.