‘आता तो घरी सांगेल’, भीतीपोटी नाशिकमधील तीन अल्पवयीन पोरी पळाल्या; पोलीस अन् नातेवाईकांनी शोधाश
नाशिक वार्ता: नाशिकच्या सिन्नर फाटा (Sinnar Phata) येथील चेहडी पंपिंग परिसरात मंगळवारी रात्री अपहरणाच्या अफवेने एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे ही अफवा अखेर फोल ठरली असून, क्षणिक भीतीपोटी घराकडे न जाता लपून बसलेल्या तिन्ही शाळकरी मुली मध्यरात्री सुरक्षित सापडल्या.
चेहडी पंपिंग परिसरात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील दहावीची विद्यार्थिनी, तिची मैत्रीण आणि बहीण या तिघी अभ्यासासाठी एकत्र आल्या होत्या. पूर्वपरीक्षेच्या पेपरची झेरॉक्स काढण्यासाठी त्या जवळच्या झेरॉक्स दुकानात गेल्या. यावेळी एका मुलीच्या वर्गातील मुलगा तेथे आला आणि तिच्याशी बोलू लागला. ही बाब अचानक त्या मुलीच्या एका नातलगाच्या नजरेस पडली.
नाशिक न्यूज : 'आता तो घरचाच सांगेल'
“ही गोष्ट तो घरी सांगेल” या भीतीने तिघी मैत्रिणी घाबरून गेल्या. घरी गेल्यास रागावले जाईल, बोलणी खावी लागतील, या कल्पनेने त्यांनी तात्काळ घरी न जाण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी परिसरातच एका ठिकाणी लपून बसण्याचा त्यांनी धाडसी पण चुकीचा निर्णय घेतला.
Nashik News: नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
दरम्यान, बराच वेळ उलटूनही मुली घरी न परतल्याने पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. नातेवाईक, मैत्रिणी आणि ओळखीच्या ठिकाणी चौकशी करूनही मुलींचा थांगपत्ता न लागल्याने अखेर नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. एकाचवेळी तीन शाळकरी मुली बेपत्ता झाल्याने अपहरणाचा संशय अधिक गडद झाला आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
Nashik News: तिन्ही मुली लपलेल्या अवस्थेत आढळल्या
तक्रार प्राप्त होताच हवालदार सानप यांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. परिसरातील सर्व शक्य ठिकाणी तपास सुरू करण्यात आला. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास परिसरातीलच एका चौकात तिन्ही मुली लपलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची विचारपूस केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
Nashik News: नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला
यानंतर पोलिसांनी मुली व त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले. गैरसमज, भीती आणि संवादाच्या अभावातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. आवश्यक समज देऊन तिन्ही मुलींना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. क्षणिक भीतीतून सुरू झालेली ही ‘पलायनकथा’ पोलिसांच्या संवेदनशील व तत्पर हस्तक्षेपामुळे सुखरूपपणे संपुष्टात आली, त्यामुळे परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.