इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मि
नाशिकचे राजकारण: एकीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबई महानगरपालिकेत (BMC Election) काँग्रेस (Congress) स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. तर दुसरीकडे नाशिकमध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि मनसेच्या (MNS) नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार असल्याचे स्थानिक नेत्यांनी म्हटले. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला काँग्रेसच्या नेत्यांचीही उपस्थिती होती. एकीकडे मनसेला काँग्रेस विरोध करत असताना नाशिकमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी मनसेच्या सोबत युतीची घोषणा केल्याने चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी दिली आहे. तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी त्या नेत्यांना तशा पद्धतीचा अधिकार दिलेला नाही असे म्हणत नाशिकमधील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना तोंडघशी पाडल्याचे पाहायला मिळाले.
याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, काँग्रेस पक्षाने मनसे सोबत जाण्याचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. स्थानिक कार्यकर्त्यांच्या संदर्भात त्यांना तिथे विचारणा करण्यात आलेली होती. त्यावेळी त्यांनी देखील त्याच पद्धतीने सांगितलेले आहे की, यासंदर्भातली निर्णय प्रदेश काँग्रेस घेत असतो. त्यामुळे या गोष्टीला काहीच अर्थ नाही. काँग्रेस पक्षाने अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी स्वतः देखील स्पष्ट केलेले आहे की, स्थानिक पातळीवर आघाडी करायला निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु फक्त इंडिया आघाडीच्या सदस्यांसोबतच चर्चा करावी हे देखील निर्णय देण्यात आलेले आहेत. जे लोक तिथे गेले होते त्यांना तशा पद्धतीचा अधिकार देखील नाही, असे त्यांनी म्हटले.
Sachin Sawant: नाशिक काँग्रेसला असा अधिकार दिलेला नाही
नाशिकमधील काँग्रेसचे नेते पत्रकार परिषदेला उपस्थित होते. आता त्यांच्यावर काही कारवाई होणार का? याबाबत विचारले असता सचिन सावंत म्हणाले की, तो निर्णय घेतलेला नाही. त्यांना तशा पद्धतीचा अधिकार नाही. त्यांच्या काय भावना आहेत त्या त्यांनी प्रदेश काँग्रेसला कळवायच्या असतात. मग प्रदेश काँग्रेस त्यावर निर्णय घेते. कोणी वैयक्तिक स्वरूपाची भावना व्यक्त करत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. नाशिक काँग्रेसला असा अधिकार दिलेला नाही.
Sachin Sawant: …तर ते चुकीचे आहेत
नाशिकमधील काँग्रेसचे पदाधिकारी राहुल दिवे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, आम्ही वरिष्ठांच्या सांगण्यानुसारच हा निर्णय जाहीर करत आहोत. याबाबत विचारले असता सचिन सावंत म्हटले की, त्यांनी अशा पद्धतीने काही सांगितले असेल तर ते चुकीचे आहे. मी त्यांच्याशी बोललो आहे. त्यांनी अशा पद्धतीने मला काही सांगितलेलं नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नाशिकमधील काँग्रेस नेत्यांनी मनसे सोबत युतीची घोषणा केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच प्रदेश काँग्रेसने नाशिकमधील नेत्यांना तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.