नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर दराडेंना आणखी एक मोठा धक्का, शिवसेनेचे 7 नगरसेवक राष्ट्रवादीत

नाशिकचे राजकारण: नाशिक विधान परिषद निवडणुकीतील (Nashik Vidhan Parishad Election 2026) पराभवानंतर दराडे गटाला येवल्यात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार किशोर दराडे (Kishor Darade) आणि कुणाल दराडे (Kunal Darade) यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या (Shiv Sena) 7 नगरसेवकांनी आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे येवल्यातील संपर्क कार्यालय गाठले. तेथे त्यांनी माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची भेट घेत चर्चा केली. यामुळे हे 7 नगरसेवक आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून येवल्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

Kishor Darade: दराडे बंधूंच्या कार्यशैलीवर नगरसेवक नाराज

नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत दराडे यांचा पराभव झाल्यानंतर येवल्यातील शिवसेनेची ताकद कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. त्यातच आता स्थानिक पातळीवर आमदार किशोर दराडे आणि कुणाल दराडे यांच्याविषयी नगरसेवकांमध्ये प्रचंड खंत आणि अविश्वास वाढला आहे. भविष्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याचे सुतोवाच या नाराज नगरसेवकांनी केले आहे. विधान परिषद निवडणुकीत दाखवलेला अविश्वास, तसेच दराडे बंधू यांच्या विषयी नाराजी असल्याने आणि भविष्यातही त्रास झाल्यास हे शिवसेनेचे सात नगरसेवक भुजबळांच्या गोटात सहभागी होणार असल्याचे सुतोवाच शिवसेना उपजिल्हाप्रमुख असलेले अमोल शिंदे यांनी केले.

Sameer Bhujbal: शहराच्या विकासासाठी महायुती एकत्र: समीर भुजबळ

या हायव्होल्टेज बैठकीनंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “महायुती (Mahayuti) म्हणून आम्ही येवल्यातील नगरसेवकांची ही बैठक घेतली होती. या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे (BJP) नगरसेवक उपस्थित होते. महायुती म्हणून आपण लोकसभा आणि विधानपरिषद एकत्र लढलो आहोत. यापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी म्हणून आपण नगर परिषद निवडणूक एकत्र लढलो होतो, त्यावेळी शिवसेना आमच्यासोबत नव्हती. मात्र आता महायुती म्हणून आपण सगळे एकत्रच आहोत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे चालणार आहोत,” असे त्यांनी म्हटले. दरम्यान, समीर भुजबळ यांनी याला केवळ महायुतीची बैठक असल्याचे म्हटले असले, तरी विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर दराडे यांच्या विरोधात थेट त्यांच्याच नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावल्याने येवल्याच्या राजकारणात शिवसेनेची ताकद कमालीची घटणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Dada Bhuse: TET पेपरफुटीवरून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी, आता शिक्षणमंत्र्याचं भर बैठकीत मोठं वक्तव्य, म्हणाले,’वेळ पडल्यास…’

Comments are closed.