नाशिक विधान परिषदेसाठी बहुमत असूनही महायुतीची धाकधूक का वाढली? कुठं बिघडू शकतं समीकरण, जाणून घ्
नाशिक विधान परिषद निवडणूक 2026: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election 2026) अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. नाशिक जिल्ह्यात महायुतीकडे (Mahayuti) तब्बल 450 मतदारांचे स्पष्ट आणि प्रचंड बहुमत आहे. त्यातच विरोधी पक्षाचा कोणताही अधिकृत उमेदवार मैदानात नाही. असे असतानाही महायुतीमध्ये कमालीची धाकधूक पाहायला मिळत असून, ऐनवेळचा दगाफटका टाळण्यासाठी थेट ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा अवलंब करावा लागला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या विजयासाठी महायुतीने विशेष खबरदारी घेतली आहे. शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे शहरी आणि ग्रामीण भागातील नगरसेवक ठाण्याच्या दिशेने रवाना झाले होते, तर आज भाजपचे (BJP) नगरसेवक देखील ठाण्याकडे सहलीसाठी रवाना होणार आहेत. 18 जून रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी कोणतीही जोखीम न पत्करण्यासाठी या सर्व लोकप्रतिनिधींना थेट मतदानाच्या दिवशीच नाशिकमध्ये आणले जाणार आहे.
Nashik Vidhan Parishad Election 2026: बहुमत असूनही महायुतीला धास्ती का? कुठं बिघडू शकतं समीकरण?
नाशिक विधान परिषद निवडणुकीत मागील काही दिवसांत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या कार्यपद्धतीवर मित्रपक्ष भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि खुद्द शिंदे गटातील काही नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांची बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि मंत्री उदय सामंत या तीन बड्या मंत्र्यांना नाशिकमध्ये ठाण मांडावे लागले होते. दीर्घ चर्चेनंतर गोकुळ गिते यांनी माघार घेऊन महायुतीला पाठिंबा देण्याचे मान्य केले असले, तरी तांत्रिक अडचण अशी आहे की, गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे या दोन्ही बंडखोरांची नावे मतपत्रिकेवर कायम असणार आहेत. नाराज मतदार ऐनवेळी पक्षादेश झुगारून या बंडखोरांच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवू शकतात, याच गोष्टीची मुख्य धास्ती शिवसेना शिंदे गटाला असल्याची चर्चा आता रंगली आहे.
या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान पद्धती असते. सभागृहात प्रत्येक राजकीय पक्षाचा ‘व्हिप’ लागू असतो, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत सभागृहाबाहेर अशी कोणतीही सक्तीची व्यवस्था नसते. त्यामुळे मतदार मतपेटीपाशी आपल्या मर्जीनुसार मतदान करण्यास पूर्णपणे स्वतंत्र असतात. ऐनवेळी मने वळवून किंवा अंतर्गत नाराजीचा फायदा उठवून बाह्य शक्तींनी मतदान फिरवू नये, यासाठी महायुतीने थेट ‘हॉटेलवारी’चे नियोजन केल्याचे बोलले जात आहे.
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाण्यातील आलिशान हॉटेलमध्ये ‘अभ्यास वर्ग’ आणि मंत्र्यांचे सत्र
सहलीवर गेलेल्या नगरसेवकांना ठाण्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असून, तिथे 18 जूनपर्यंत वेगवेगळ्या सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. उपमहापौर विलास शिंदे यांनी सांगितले की, महायुतीचे अनेक सदस्य हे नवीन आहेत. त्यांना पसंतीक्रमाच्या गुंतागुंतीच्या मतदान पद्धतीचा अभ्यास करून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि उदय सामंत हे स्वतः या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. तर मतदानाच्या एक दिवस आधी, म्हणजेच 17 जून रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिकच्या मतदारांना सहलीच्या ठिकाणीच विशेष मार्गदर्शन करणार असल्याचे देखील समजते.
Nashik Vidhan Parishad Election 2026: आम्ही फक्त मताधिक्यासाठी लढतोय: अजय बोरस्ते
या सर्व घडामोडींवर बोलताना भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी विश्वास व्यक्त केला की, “युतीचा धर्म भाजपचे सर्व नगरसेवक 100 टक्के पाळतील.” तर दुसरीकडे महापालिकेतील शिंदे गटाचे गटनेते अजय बोरस्ते यांनी दावा केला की, “महायुतीसाठी निवडणूक जिंकणे हा विषयच राहिलेला नाही, तर आम्ही किती मोठ्या मताधिक्याने जिंकणार, हा एकमेव विषय आता शिल्लक आहे.” त्यामुळे आता महायुतीची हे ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ किती यशस्वी ठरते, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.