मतमोजणी केंद्रावर पोहोचताच गोकुळ गीतेंनी ‘तो’ मुद्दा हेरला, वकिलांना बोलावलं अन् मतमोजणी थांबली

नाशिक विधान परिषद निवडणूक निकाल 2026: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच मतमोजणी कक्षात आज प्रचंड गोंधळ उडाला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांचे समर्थक मतमोजणी कक्षातच समोरासमोर आले आणि त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या गोंधळामुळे मतमोजणीची प्रक्रिया काही काळ ठप्प झाली होती.

गोकुळ गीते यांनी मतमोजणी केंद्रावर पोहोचताच एका मुद्द्यावर आक्षेप घेतला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे हे प्रतिनिधी म्हणून मतमोजणी केंद्रात आत उपस्थित होते. किशोर दराडे हे स्वतः नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

गोकुळ गीते यांनी नियम उधृत करत आक्षेप घेतला की, “निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कुठल्याही विद्यमान लोकप्रतिनिधीला मतमोजणी केंद्रात प्रतिनिधी म्हणून राहण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे आमदार किशोर दराडे यांनी तात्काळ मतमोजणी केंद्राच्या बाहेर जावे.”

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: वकिलांना पाचारण अन् निवडणूक नियमांचे दाखले

हा वाद केवळ तोंडी राहिला नाही. गोकुळ गीते यांच्या वतीने तातडीने त्यांच्या वकिलांना मतमोजणी केंद्रावर बोलावण्यात आले. गीतेंच्या वकिलांनी निवडणूक आयोगाच्या नियमावलीची कागदपत्रे आणि काही महत्त्वपूर्ण दाखले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सादर केले. मतमोजणी प्रक्रियेत कोणाचा सहभाग असू शकतो आणि कोणाचा नाही, याचे कायदेशीर पुरावे अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर दोन्ही बाजूंची सुनावणी पार पडली.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: मतमोजणी कक्षात समर्थक भिडले

गोकुळ गीते जेव्हा मतमोजणी केंद्राजवळ आले, तेव्हा तिथे आधीपासूनच किशोर दराडे आणि त्यांचे समर्थक उभे होते. गीते यांनी आक्षेप घेताच दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये आधी शब्दाने शब्द वाढला आणि त्याचे पर्यावसान मोठ्या गोंधळात झाले. मतमोजणी कक्षाच्या आतच दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने सुरक्षा यंत्रणेचीही धावपळ उडाली.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: दराडे गटाकडूनही पलटवार

गोकुळ गीते यांच्या आक्षेपानंतर दराडे यांच्या वतीनेही प्रति-आक्षेप घेण्यात आला. “निवडणूक उमेदवार स्वतः मतमोजणी केंद्रात हजर असताना, त्यांच्या इतर प्रतिनिधींनी मतमोजणीच्या टेबलावर बसू नये,” असा आक्षेप दराडेंनी घेतल्याची माहिती गीते यांच्या वकिलांनी दिली.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: अधिकाऱ्यांकडून शंका निरसन, अखेर मतमोजणी सुरू

या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे कायदेशीर मुद्दे ऐकून घेतले. वकिलांनी मांडलेल्या मुद्द्यांवर विचार करून निवडणूक अधिकाऱ्यांनी कायदेशीर शंकांचे निरसन केले. प्रशासनाने मध्यस्थी करत नियमांनुसार पुढील कार्यवाही निश्चित केली. या संपूर्ण गोंधळानंतर आणि कायदेशीर पेच सुटल्यानंतर अखेर नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला पुन्हा सुरळीत सुरुवात झाली आहे.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: पोलिसांचा मोठा बंदोबस्त

दरम्यान, दराडे आणि गीते यांच्यामध्ये मतमोजणीच्या ठिकाणी मोठा वाद झाला. गोकुळ गीते यांनी आमदार किशोर दराडे यांना मतमोजणी कक्षाच्या बाहेर ठेवावे, लोकप्रतिनिधींना आतमध्ये प्रवेश देऊ नये, असा आक्षेप घेतला. त्यानंतर गीते आणि दराडे समर्थकांमध्ये मोठा गदारोळ मतमोजणी कक्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर झाला. या पार्श्वभूमीवर मतमोजणी कक्षाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आणखी वाचा

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: उदय सामंत-गिरीश महाजनांनी नाकदुऱ्या काढून समजूत काढली, पण गोकुळ गिते निकालाच्या दिवशी फिरले, नाशिक विधान परिषद निकालाच्या दिवशी सर्वात मोठा ट्विस्ट!

Comments are closed.