शेअर मार्केटमध्ये 15 लाखांचं नुकसान, युवकाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतलं अन्…; नाशिकमधील धक
नाशिक बातम्या: शेअर्स मार्केटमध्ये (Share Market) सुमारे 15 लाख रुपयांची रक्कम बुडाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या 30 वर्षीय तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. या घटनेत युवक 90 टक्के भाजला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात (Nashik Civil Hospital) उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुळचा चांदवड (Chandwad) तालुक्यातील विटाई येथील व सध्या खुटवडनगर परिसरात राहणाऱ्या रवींद्र शिवाजी कोल्हे (30) या तरुणाने शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. तो प्रारंभी खासगी इन्शुरन्स कंपनीत व सध्या खासगी बँकेत कामाला होता. त्याने पैसे आई-वडिलांना न देता शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार कोसळत असल्याने त्याचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले होते.
स्वतः च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले पेटवून
त्यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. त्याच्या मित्रांनी त्याला पैशांची मदतही केली होती. मात्र, एवढी मोठी रक्कम कशी फेडणार? आई-वडिलांनाही आपण फसवले असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याने बुधवारी दुपारी त्याने पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर (एमएच 15 जीई 7785) या क्रमांकाच्या दुचाकीवर बसून स्वतः च्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेतले. या घटनेत तो 90 टक्के भाजला होता. त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक विश्वास पाटील या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
प्रवाशाची बॅग चोरणाऱ्यास बेड्या
दरम्यान, नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे फलाट क्रमांक एकवर गाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशाचा मोबाइल व रोख रकम ३० हजारांची बॅग नकळत अज्ञात इसमाने चोरून नेली. याबाबत नाशिक रोड लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल होताच नाशिकरोड आरपीएफ व जीआरपी यांनी संयुक्त टीम बनवून आरोपीबाबत गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषण करून त्याचा शोध घेतला. आरोपी आकाश शंकर अडगले (रा. जय भवानी रोड, नाशिक रोड) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 19 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक सूर्यकांत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन बनकर, आरपीएफचे पोलीस निरीक्षक हर फुलसिंग यादव, पोलीस निरीक्षक खर्च, सोनवणे, तपास पथकाचे प्रमुख संतोष उफाडे पाटील, शैलेश पाटील, गणेश कांबळे, सागर वर्मा व मनीष कुमार यांच्या पथकाने केली.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.