दिव्या देशमुख, तेजस्विन शंकर आणि गायत्री गोपीचंद यांच्यासह १७ जणांना अर्जुन पुरस्कार; २०२५ या वर्षासाठी खेलरत्न पुरस्कार नाही
क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. २०२५ या वर्षासाठी विश्वचषक विजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, डेकॅथलॉनपटू आणि उंच उडीपटू तेजस्विन शंकर तसेच बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद यांच्यासह १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी मंगळवारी निवड करण्यात आली. दरम्यान, या १७ नावांमध्ये एकाही क्रिकेटपटूच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच क्रीडा मंत्रालयाने २०२५ या वर्षासाठी कोणत्याही खेळाडूला प्रतिष्ठेचा ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये देशातील कोणत्याही खेळाडूला खेलरत्न पुरस्कार मिळाला नव्हता.
अर्जुन पुरस्काराच्या यादीत ग्रँडमास्टर विदित गुजराथी, गायत्री गोपीचंदची महिला दुहेरीतील साथीदार ट्रीसा जॉली, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता बॉक्सर नरेंद्र बरवाल आणि युवा कर्णबधिर रायफल नेमबाज धनुष श्रीकांत यांचाही समावेश आहे. यंदा निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी २४ नावांची शिफारस केली होती. मात्र, मंत्रालयाने त्यापैकी केवळ १७ नावांना मंजुरी दिली.
१९ वर्षीय दिव्या देशमुख ही विश्वचषक जिंकणारी पहिली हिंदुस्थानी महिला आहे. विदित गुजराथी हा २०२४च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या हिंदुस्थानी संघाचा सदस्य होता.
क्रीडा पुरस्कारांच्या घोषणेच्या विलंबावरून टीका करणाऱ्या खेळाडूलाही पुरस्कार
तेजस्विन शंकरने २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉनमध्ये ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर गेल्या वर्षी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने दुसरे स्थान मिळवले. नुकतेच गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत असतानाही त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले. पुरस्कारांच्या घोषणेला होत असलेल्या विलंबावर टीका करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचाही समावेश होता. हा विलंब खेळाडूंचा अनादर करणारा असल्याचे त्यांनी म्हटले होते.
२०२४ मध्ये विक्रमी ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यात पॅरा-स्पोर्ट्समधील १७ खेळाडूंचा समावेश होता. यावेळी पॅरा-स्पोर्ट्समधील केवळ दोन खेळाडूंना अंतिम यादीत स्थान मिळाले.
२०२४च्या पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पॅरा क्लब थ्रोपटू एकता भयान आणि २०२४च्या पॅरा वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज रुद्रांश खंडेलवाल यांचा या यादीत समावेश आहे. एकताने गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकही जिंकले होते.
मात्र, या यादीत एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही. २०२३ मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार मिळाल्यापासून क्रिकेटपटूला या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेले नाही.
१९६२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या हिंदुस्थानी फुटबॉल संघाचा सदस्य असलेले आय. अरुमैनायगम हे ‘जीवनगौरव’ अर्जुन पुरस्काराचे एकमेव मानकरी ठरले. मंत्रालयाने तीन द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांचीही नावे जाहीर केली आहेत. महिलांच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचा तसेच दिग्गज एम. सी. मेरी कोमच्या सपोर्ट स्टाफचा भाग राहिलेले बॉक्सिंग प्रशिक्षक छोटे लाल यादव हे या छोट्या यादीतील सर्वात प्रमुख नाव आहे. प्रशिक्षण क्षेत्रातील ‘जीवनगौरव’ सन्मानासाठी पुरुषांच्या राष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देणारे धर्मेंद्र यादव आणि कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र कुमार यांची निवड करण्यात आली आहे.
यंदाच्या पुरस्कार निवड समितीत हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) उपाध्यक्ष गगन नारंग, माजी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट आणि माजी हॉकीपटू एम. एम. सोमय्या यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश होता.
देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासोबत पदक, प्रशस्तिपत्र आणि २५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते. तर अर्जुन पुरस्कार विजेत्याला १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळते.
पुरस्कारांच्या घोषणेला यंदा मोठा विलंब
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी पारंपरिक पद्धतीने हे पुरस्कार प्रदान केले जात होते. २९ ऑगस्ट हा हिंदुस्थानचे महान क्रीडापटू आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिनही आहे. मात्र, २०२० मध्ये कोविड-१९ महामारीच्या काळात आरोग्यविषयक नियमांमुळे पुरस्कार सोहळा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्यानंतर पुरस्कार वितरणाची तारीख निश्चित राहिलेली नाही. अनेक वेळा विविध क्रीडा स्पर्धांमधील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करता यावा म्हणून २९ ऑगस्टनंतर दोन महिन्यांनी पुरस्कार सोहळा घेण्यात आला आहे. आतापर्यंत सर्वाधिक उशिरा हा सोहळा गेल्या वर्षी १७ जानेवारी रोजी झाला होता. मात्र, २०२६चे निम्म्याहून अधिक वर्ष उलटल्यानंतर २०२५च्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा होणे हा १९९१मध्ये या पुरस्कारांची सुरुवात झाल्यापासूनचा सर्वात मोठा विलंब ठरला आहे. पुरस्कारांच्या घोषणेला मोठा विलंब झाला आहे. पुरस्कारांची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी केवळ पात्र आणि योग्य खेळाडूंनाच सन्मान मिळावा, याची खात्री करण्यासाठी मंत्रालयाने फेरमूल्यांकनाची प्रक्रिया जाहीर केली होती, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
अर्जुन पुरस्कार: तेजस्विन शंकर (ॲथलेटिक्स), प्रियांका गोस्वामी (ॲथलेटिक्स), नरेंद्र (बॉक्सिंग), विदित गुजराथी (बुद्धिबळ), दिव्या देशमुख (बुद्धिबळ), धनुष श्रीकांत (कर्णबधिर नेमबाजी), राजकुमार पाल (हॉकी), सुरजीत (कबड्डी), रुद्रांश खंडेलवाल (पॅरा-नेमबाजी), एकता भयान (पॅरा-ॲथलेटिक्स), अरविंद सिंह (रोइंग), अखिल श्योराण (नेमबाजी), ट्रीसा जॉली (बॅडमिंटन), गायत्री गोपीचंद (बॅडमिंटन), लालरेमसियामी (हॉकी), मोहम्मद अजमल (ॲथलेटिक्स), पूजा (कबड्डी).
अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) : श्री. I. अरुमानयागम (फुटबॉल).
द्रोणाचार्य पुरस्कार: परवीर सिंग, छोटे लाल यादव, नेहा चव्हाण.
द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) : धर्मेंद्र यादव, वीरेंद्र कुमार.
Comments are closed.