नवी मुंबईत APMC शेजारील ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग, आठ ते दहा ट्रक आणि टेम्पो जळाल्याची शक्यता

नवी मुंबई एसएपीसी आग: नवी मुंबईतील (Navi Mumbai) एपीएमसी मार्केट परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यात मार्केट शेजारी असलेल्या एका ट्रक ट्रमिनलमध्ये भीषण आग (Fire Accident News) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 8 ते 10 ट्रक, टेम्पो जळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कॅरेट आणि ट्रेच्या गोडाऊनमुळे ही आग पसरली असल्याचे समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत. दरम्यान, तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळलेलं नाही. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून सुदैवाने या आगीत अद्यापतरी कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

धनसार औद्योगिक क्षेत्रातील प्लॅटिनम पॉलीमर्स कंपनीत भीषण आग

दरम्यान, दुसरीकडे पालघर मधील धनसार औद्योगिक क्षेत्रातील प्लॅटिनम पॉलीमर्स या कंपनीत ही अशीच एक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रात्री तीन वाजताच्या सुमारास सदर आग लागली असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचे प्रयत्न सरू आहेत. सदर कंपनी रात्री सुरू असताना आग लागली आहे. आगीनंतर कामगार मात्र सुखरूप असून कोणतीही जीवितहानी यात झालेली नाही. पुढे आलेल्या माहितीनुसार, पीव्हीसी पावडर बनवणारी कंपनी असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

रील बनविण्याच्या नादात तरुणाचा खड्ड्याच्या खोल पाण्यात बुडून मृत्यू

मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात एका 17  वर्षीय तरुणानं स्वतःचा जीव गमवीला. ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये मित्रांनी चित्रीत केली. ही घटना भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुल्हाड शेतशिवारात सायंकाळी घडली. तीर्थराज बारसागडे असं मृत तरुणाचं नावं असून तो सोनेगाव येथील असून त्याला रील काढून सोशल मीडियावर टाकण्याची आवड होती. मृतक तीर्थराज याला शेतशिवारात असलेल्या एका मोठ्या खड्ड्यातील पाण्यात पोहण्याची रिल बनवायची होती. हे संपूर्ण चित्रीकरण करण्यासाठी त्यानं स्वतःचा मोबाईल मित्रांना दिला. आणि ते खड्ड्याच्या दुसऱ्या भागात उभे राहून चित्रिकरण करीत होते.

मात्र, ज्या खोल खड्ड्यात तीर्थराजनं पोहण्यासाठी सुर मारला, त्या खड्ड्यांचा अंदाज नसल्यानं तीर्थराज खोल पाण्यात गटांगड्या खाऊ लागला. त्यानं बुडतो वाचवा अशी शेवटची हाक मित्रांना मारली. मात्र, तो रिलचा भाग असावा, असा समज चित्रिकरण करणाऱ्या मित्रांना झाली आणि मदत मिळायच्या आतचं तीर्थराज पाण्यात बुडाला. हे संपूर्ण थरार मोबाईलमध्ये कैद झालं. अड्याळ पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी तीर्थराजचा मृत्यू रिल बनविताना खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास अड्याळ पोलीस करीत आहे.

https://www.youtube.com/watch?v=gpmuks4tfoi

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.