मुंबई हादरली! नेवी नगरमध्ये नौसैनिकासह पत्नी व दोन मुलांचा मृतदेह आढळला

मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नौसैनिकासह पत्नी व दोन मुलांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहांमध्ये नौसैनिकासह त्याची पत्नी आणि अवघ्या दोन महिने व तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या नौसैनिकाने प्रथम आपल्या पत्नीला आणि दोन्ही लहान मुलांना विषारी औषध देऊन ठार केले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, प्राथमिक तपासात नौसैनिकाचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे स्पष्ट होत आहे, तर पत्नी आणि मुलांचा मृत्यू विष दिल्याने झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे नेव्ही नगर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, नौसैनिकाने हे अत्यंत टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले, याचा शोध घेतला जात आहे. सध्या मुंबई पोलीस आणि नौदलाकडून या प्रकरणाचा संयुक्तपणे सखोल तपास सुरू आहे.

Comments are closed.