नौदलाने मुख्य सी किंग हेलिकॉप्टर स्क्वाड्रन निवृत्त केले.

फ्लाइंग फ्रिगेट’ असे मिळाले होते नाव : भारतीय नौदलाकडून 36 वर्षांपर्यंत वापर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय नौदलाने स्वत:च्या सर्वात विश्वसनीय आणि शक्तिशाली सी किंग एमके 42 बी हेलिकॉप्टरच्या मुख्य स्क्वाड्रनला अधिकृत स्वरुपात निवृत्त केले आहे. तीन दशकांपेक्षाही अधिक काळापर्यंत भारतीय सागरी सीमांची सुरक्षा करणाऱ्या आणि नौदलाच्या अभियानांचा कणा मानण्यात येणाऱ्या या हेलिकॉप्टरला  फ्लाइंग फ्रिगेट नावाने ओळखले जात होते.

आयएनएस शिक्रावर तैनात आयएनएएस 330 हारपून्स स्क्वाड्रनकडून संचालित या सी किंग ताफ्याने देशाची 36 वर्षांपर्यंत सेवा केली आहे. आता याला अधिकृत स्वरुपात नंबर-प्लेटेड म्हणजेच निष्क्रीय करण्यात आले आहे. मुख्य स्क्वाड्रन हटल्यावर आता नौदलाकडे केवळ एक अंतिम सक्रीय सी किंग स्क्वाड्रन राहणार असून यात जुन्या सी किंग एमके 42 सी वेरिएंटची काही हेलिकॉप्टरच शिल्लक आहेत, ज्यांचा वापरही आगामी काळात टप्पाबद्ध पद्धतीने बंद करण्यात येणार आहे.

सी किंगची ऐतिहासिक भूमिका

मुख्य ताफ्याच्या निरोपानंतर शिल्लक मोजक्या सी किंग हेलिकॉप्टर्सचे संचालन आता विशाखापट्टणम येथील ‘आयएनएस डेगा’वर तैनात आयएनएएस 350 ‘सारस’ स्क्वाड्रनकडून केले जात आहे. या हेलिकॉप्टर्सना आता मुख्य लढाऊ भूमिकांमधून हटवत प्राथमिक स्वरुपात शोध आणि बचाव अभियान तसेच विशेष नौसैनिक अभियानांच्या बॅकअप सपोर्टच्या कामात सामील करण्यात आले आहे. स्वत:च्या गौरवशाली इतिहासात ब्रिटिशांकडून निर्मित सी किंग हेलिकॉप्टर्सनी समुद्रात भारताच्या शक्तीची प्रचिती करून दिली होती. शत्रूच्या पाणबुड्या शोधून नष्ट करणे, सागरी जहाजांवर हल्ला करणे, 24 तास सागरी देखरेखीसोबत चक्रीवादळ आणि आपत्तींदरम्यान मानवीय सहाय्य आणि बचावकार्यांमध्ये हेलिकॉप्टरचा वापर केला जात होता. मोठ्या युद्धनौकांवर सहजपणे लँड करणे आणि अत्याधिक घातक शस्त्रास्त्रांनी युकत असल्याने नौसैनिक याला ‘फ्लाइंग फ्रिगेट’ म्हणत होते.

अमेरिकन ‘रोमियो’ची एंट्री

भारतीय नौदलातील या जुन्या हेलिकॉप्टरच्या जागी अमेरिकेकडून प्राप्त अत्याधुनिक एमएच-60 आर सीहॉक रोमियो हेलिकॉप्टर्सना सामील करण्यात येणार आहे. भारताने अमेरिकेच्या प्रशासनासोबत केलेल्या कराराच्या अंतर्गत एकूण 24 एमएच-60आर हेलिकॉप्टर्सची ऑर्डर दिली होती, यातील 21 हेलिकॉप्टर्स भारताला प्राप्त झाली आहेत. लॉकहीड मार्टिन कंपनीकडून निर्मित एमएच-60 आर याला जगातील सर्वात आधुनिक नौसैनिक हेलिकॉप्टर मानले जाते. हे हेलिकॉप्टर अत्याधुनिक सेंसर, एमके-54 टॉरपीडो आणि एजीएम-114 हेलफायर क्षेपणास्त्रांनी युक्त आहे.

Comments are closed.