महाराष्ट्र, बंगालसह सर्वत्र भाजपकडून बेईमानांची पैदास; सामना अग्रलेखातून संजय राऊतांचा प्रहार

सामना अग्रलेख: महाराष्ट्र असेल, नाहीतर बंगाल, सर्वत्र याच पद्धतीने बेइमानांची पैदास करण्याचे तंत्र भाजपने अवलंबले आहे. पंजाबातही त्यांनी आपसारख्या पक्षाचे खासदार फोडलेच आहेत. महाराष्ट्र, बंगाल, पंजाब ही राज्ये म्हणजे शूर व स्वाभिमानी लोकांची भूमी. दिल्लीतील व्यापार मंडळाने या राज्यांतील शौर्य, स्वाभिमानाची जणू सुंताच करून टाकली. या राज्यांतील सत्ताधाऱ्यांनी आपापल्या कार्यालयांवर आणि घरांवर बोर्ड लावून सांगावे, “जनहो, आमच्या येथे स्वाभिमानाची सुंता करून मिळेल!” अशा तिखट शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) सामना अग्रलेखातून (Saamana Agralekh) भाजप शिवसेनेसह सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला आहे.  (Sanjay Raut Saamana Agralekh on Operation Tiger)

Saamana Agralekh : सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?

राजकारण हे बेभरवशाचेच झाले आहे. तरीही राजकारणात एखाद्या पुरुषाचे भाग्य कधी फळफळेल ते सांगता येत नाही. प. बंगालात अशा भाग्योदयाचे अजीर्ण झाले आहे. ‘नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ या भोपळेबाज पार्टीला लॉटरी लागली व तिला अचानक 22 ‘रेडीमेड’ खासदारांचा लाभ झाला. आतापर्यंत इतके खासदार कधी शिवसेनेला मिळाले नाहीत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाले नाहीत. असे अनेक राजकीय पक्ष आहेत, ज्यांनी सारी हयात घालवली, पण त्यांना एक आमदार व एखादा खासदार निवडून आणता आला नाही. ऍड. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, केजरीवाल यांच्यासारख्या मोठय़ा नेत्यांनाही जे जमले नाही ते त्रिपुरातील नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाला शक्य झाले. भारतीय लोकशाहीतला हा चमत्कार शक्य झाला तो पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा व भारताचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तपश्चर्येमुळे. ही एक ‘पार्टी’ त्रिपुराची आहे. त्रिपुरात लोकसभा खासदारांचे बळ फक्त दोन आहे; पण या त्रिपुरी पक्षाचे एकूण 22 खासदार लोकसभेत दिसतील व ते पंतप्रधान मोदी यांचे ‘होयबा!’, ‘जी हुजूर’ म्हणून काम करतील. ‘उप्परवाला देता है, तो छप्पर फाडके देता है.’ न मागता ‘धो-धो’ देतो, ‘नको नको’ म्हणताना देतो हे या प्रकरणात सिद्ध झाले.

हा जो कोणता NCPI नावाचा अज्ञात पक्ष आहे, त्या पक्षाचे अध्यक्ष श्रीमान उत्तिया कुंडू यांनाही कधी आमदार, खासदार, साधे नगरसेवक होता आले नाही. त्रिपुरा विधानसभेत त्यांना एकूण राज्यभरात 862 मते मिळाली. प. बंगालात ते चार जागी लढले व त्यांना ‘नोटा’पेक्षा कमी मते पडली. हावडाच्या एका बोळात या पार्टीच्या बाकडा कार्यालयाची नोंद आहे व या कार्यालयात एक तुटके बाकडे आहे. आता हा तुटक्या बाकड्याचा पक्ष एका रात्रीत प. बंगालातील सर्वात जास्त खासदार असलेला पक्ष बनला. गंमत अशी की, आपल्याला अचानक 20-22 रेडिमेड खासदारांची लॉटरी लागली हे त्या पक्षाचे प्रमुख उत्तिया कुंडू यांनाच माहीत नाही.

त्यामुळे उत्तिया कुंडू गोंधळले, भांबावले व चक्रावले आहेत. खासदारांचे हे मनी लॉण्डरिंग अचानक आपल्या पक्षात झाले. त्यामुळे ते घाबरले आहेत, पण त्यांना तसे घाबरायचे कारण नाही. तृणमूल पक्षातले एकजात सर्व डरपोक व स्वार्थी, विकाऊ खासदार सुरक्षेसाठी कुंडू यांच्या बोळातील पक्षातच स्वतःचा विलय करून मोकळे झाले आहेत. भारतीय राजकारणाच्या गटारगंगेचा हा काळाकुट्ट अध्याय आहे. तृणमूल काँग्रेस निवडणुकीनंतर औषधालाही उरणार नाही, अशी जी भीष्मप्रतिज्ञा कोलकात्यात अमित शहा, सुवेंदू अधिकारी वगैरे लोकांनी केली होती, ती त्यांनी प्रत्यक्षात खरी करून दाखवली. बॅनर्जी यांच्या पक्षात सर्व भगोडे, डरपोक व विकाऊ लोक होते. ‘माँ, माटी, मानुष’ वगैरे बंगाली अस्मितेच्या त्यांच्या वल्गना खोट्या होत्या. त्यांना ना ममतांविषयी प्रेम होते, ना बंगालच्या अस्मितेविषयी प्रेम होते. एका पराभवाने ते पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले व पाचोळ्यासारखे उडून गेले. यातील काही जण ममता बॅनर्जीबरोबर 30-35 वर्षे काम करीत होते.

स्वतः ममता बॅनर्जी यांनी प. बंगालच्या राजकारणात संघर्ष केला हे खरे, पण आता जे आमदार, खासदार पळून गेले त्यांनी कोणताही संघर्ष न करता आयतीच पदे मिळवली व आता संकटसमयी पळून गेले. त्यामुळे कल्याण बॅनर्जी, सौगत राय, डेरेक ओब्रायन, सागरिका घोष, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद, महुआ मोईत्रा अशा निष्ठावान मंडळींचे कौतुक वाटते. ममता बॅनर्जी यांनी किती तकलादू लोक आसपास उभे केले होते, हे आता दिसले. अर्थात, सध्या सत्तेच्या बाजारात याच बेइमानांना ‘भाव’ आला आहे. हे चित्र सर्वत्र दिसत आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांनी ज्यांना नेते केले, मंत्री केले तेच पळून गेले व श्री. उद्धव ठाकरे यांनी ज्यांना मंत्री वगैरे करून सर्व दिले तेच सगळ्यात आधी बेइमान झाले. राजकारणात पूर्वी माणसांची पारख होत असे. आज ‘सब घोडे बारा टके’ या सरधोपट मार्गाने

पदांची आणि सत्तेची खैरात होते. त्यांना ना निष्ठा, ना विचार, ना भूमिका. हवा येईल तसे ‘आयाराम-गयाराम’ व्हायचे. अशा ‘आयाराम- गयारामां’ना पदक वाटण्याचे काम व्यापारी पद्धतीने दिल्ली दरबारी चालते. त्या दरबारात येऊन स्वाभिमान गहाण ठेवला की, पैसा-पदाचे घोडे गंगेत न्हाल्याचे म्हणे पुण्य लाभते. ‘कोणत्याही संख्येत फुटा व मोदींना पाठिंबा द्या’ हे भाजपचे धोरण आहे. ही एक प्रकारची राक्षसी भूक आहे, पण यांच्या हातात दिल्लीची सत्ता, ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणा नसत्या, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाच्या ‘शेंड्या’ नसत्या तर हा आजचा हैदोस घालता येणे शक्य होते काय? जे त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडवले तेच तृणमूलबाबत घडले.

तृणमूलच्या आठ-दहा खासदारांना त्यांची जुनी प्रकरणे उकरून धमकावले असे म्हणतात, पण कालपर्यंत ममता दीदींच्या पदराआडून डरकाळ्या फोडणारे हेच लोक इतक्या लवकर लटपटू लागले हे प. बंगालच्या लढाऊ बाण्यास शोभणारे नाही. हे सर्व फुटीर भाजपसमोर शरणागत झाले आणि गांडुळासारखे वळवळू लागले. या लोकांना मोदी-शहांनी थेट भाजपमध्ये घ्यायलाही नकार दिला. एका उकिरड्याच्या पक्षात त्यांची रवानगी केली. त्यामुळे शेपटी हलवत फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांसारखी तृणमूलमधून फुटून निघालेल्या खासदारांची अवस्था झाली आहे. पुन्हा अपात्रतेची टांगती तलवार यांच्या डोक्यावर लटकत आहे ती वेगळीच. महाराष्ट्र असेल, नाहीतर बंगाल, सर्वत्र याच पद्धतीने बेइमानांची पैदास करण्याचे तंत्र भाजपने अवलंबले आहे. पंजाबातही त्यांनी आपसारख्या पक्षाचे खासदार फोडलेच आहेत. महाराष्ट्रबंगाल, पंजाब ही राज्ये म्हणजे शूर व स्वाभिमानी लोकांची भूमी. दिल्लीतील व्यापार मंडळाने या राज्यांतील शौर्य, स्वाभिमानाची जणू सुंताच करून टाकली. या राज्यांतील सत्ताधाऱ्यांनी आपापल्या कार्यालयांवर आणि घरांवर बोर्ड लावून सांगावे, “जनहो, आमच्या येथे स्वाभिमानाची सुंता करून मिळेल!”

Comments are closed.