नयनताराचा टक्कल लूकमधला फोटो व्हायरल; AI चा पर्दाफाश, चाहतेही चक्रावले
दक्षिणेची सुपरस्टार नयनतारा सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आली आहे. मंदिराबाहेर पूर्णपणे टक्कल असलेल्या नयनताराचे काही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. हे फोटो समोर येताच चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली—नयनताराने तिच्या आगामी चित्रपटासाठी खरंच टक्कल केले आहे का? मात्र, या व्हायरल फोटोंमागचं सत्य समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. सोशल मीडिया युझर्सनी बारकाईने फोटो तपासल्यानंतर हे फोटो AIच्या मदतीने तयार करण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे नयनताराने खरंच टक्कल केले असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये नयनतारा एका मंदिराबाहेर दिसत असून तिचे डोके पूर्णपणे मुंडण केलेले दाखवण्यात आले आहे. तिचा हा अनोखा लूक पाहून इंटरनेटवर लगेचच चर्चा सुरू झाली. काही चाहत्यांनी तर हा लूक तिच्या आगामी ‘टॉक्सिक’ चित्रपटातील भूमिकेशी जोडण्यास सुरुवात केली.
मात्र, काही सोशल मीडिया युझर्सच्या लक्षात या फोटोंमध्ये AI वॉटरमार्क असल्याचे आले. एका युझरने कमेंट करत लिहिले, “पुढच्या वेळी फोटो काढताना AI वॉटरमार्क काढायला विसरू नका.” तर दुसऱ्या युझरने नयनताराने प्रत्यक्षात असे केले असेल, यावर विश्वास नसल्याचे म्हटले.
आणखी एका युझरने दावा केला की, चित्रपटासाठी कोणतीही अभिनेत्री अशा प्रकारे डोक्याचे मुंडण करणार नाही आणि हे फोटो स्पष्टपणे AIच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे सुरुवातीला खरे वाटणाऱ्या या फोटोंचा बनावटपणा सोशल मीडिया युझर्सनीच उघड केला.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्हायरल फोटोंमागे नयनताराची मंदिराला दिलेली खरी भेट आहे. एप्रिलमध्ये नयनताराने तिचा पती विग्नेश शिवनसोबत तिरुमला मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी ती मंदिराबाहेर दिसली होती. मात्र, तिचे टक्कल असलेले फोटो मूळ फोटोमध्ये AIच्या मदतीने बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. या फोटोंवर सध्या सोशल मीडियावर अनेक गमतीशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही चाहते नयनताराचा हा लूक पाहून सुरुवातीला आश्चर्यचकित झाले, तर काहींनी लगेचच फोटोमधील AIचा वॉटरमार्क ओळखून सत्य समोर आणले.
Comments are closed.