महिलांनी एसडीओ कार्यालय गाठत मुख्यमंत्र्यांना दिल्या बांगड्या भेट; 4 दिवसांपासून आमरण उपोषण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जागर प्रतिष्ठानचे विशाल जाधव यांचे गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत जागर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेत थेट उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठले. यावेळी महिलांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना बांगड्या भेट म्हणून दिल्या.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. चार दिवस उलटूनही प्रशासनाकडून मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. प्रशासनाने तातडीने उपोषणाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिलांनी मोठ्या संख्येने उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन आपला संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चार दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसाठी बांगड्या देऊन निषेध करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ एसडीओ कार्यालय परिसरात वातावरण तापले होते.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने आरोप तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलनकत्यांनी केली. मागण्यांची दखल घेऊन ठोस कार्यवाही करण्यात आली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, महिलांनी थेट एसडीओ कार्यालय गाठून बांगड्या दिल्याने या आंदोलनाची शहरात चर्चा सुरू झाली आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची प्रशासन आता कधी दखल घेते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय होतो, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.