सात साखर कारखान्यांना ‘एनसीडीसी’ने कर्ज नाकारले, भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना जोरदार झटका
राज्यातील सात साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अर्थात ‘एनसीडीसी’ने कर्ज नाकारले आहे. राज्य सरकारकडून एकूण 14 साखर कारखान्यांचे प्रस्ताव ‘एनसीडीसी’कडे पाठवण्यात आले होते; परंतु त्यापैकी केवळ सात साखर कारखान्यांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून उर्वरित सात कारखान्यांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहे. एनसीडीसीच्या या निर्णयामुळे पक्षांतर करून भाजपमध्ये जाणाऱया नेत्यांना जोरदार झटका बसला आहे. कारण, कारखान्यासाठी पैसे मिळतील या आशेने काही राजकीय नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
एनसीडीसीने कर्ज नाकारलेले तीन कारखाने हे पुणे जिह्यातील आहेत. सलग तीन वर्षे बंद असलेल्या आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहकारी कारखान्यांना कर्ज देण्यास राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने सपशेल नकार दिला आहे. राजगड सहकारी साखर कारखान्याचे नेते संग्राम थोपटे यांनी कारखाना वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राज्य सरकारने कारखान्याचा विस्तार करण्यासाठी 467.85 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा प्रस्ताव एनसीडीसीकडे पाठवला होता. परंतु, हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. कारखान्याला पैसे मिळतील या आशेने शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांनी अजित पवार गटाशी जुळवून घेतले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अशोक पवार यांची पत्नी अजित पवार गटाच्या घडय़ाळ चिन्हावर निवडून आल्या होत्या. तर इंदापूर तालुक्यातील भवानी नगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचीही तीच गत झाली असून त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे. शरद लाड यांचे वडील अरुण लाड हे विधान परिषदेचे आमदार असून ते राष्ट्रवादीत शरद पवार यांच्यासोबत आहेत. परंतु, कारखान्याला मदत मिळेल या आशेने शरद लाड यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ज्यांच्या साखर कारखान्यांना कर्ज नाकारण्यात आले आहे त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, बसवराज पाटील, धर्मराज काडादी, राहुल जगताप यांचा समावेश आहे.
प्रस्ताव स्वीकारला
कोल्हापुरातील श्री भोगावती सहकारी साखर कारखाना लिमिटेड, श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. तर सांगलीतील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, अहिल्यानगरमधील मुळा सहकारी साखर कारखाना, साताऱयातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आणि बीडमधील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
प्रस्ताव फेटाळले
- रामेश्वर सहकारी साखर कारखाना, जालना (106.08 कोटी थकबाकी).
- श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना लि., धाराशीव (72 कोटी थकबाकी).
- रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, पुणे (184.12 कोटी थकबाकी).
- श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, अहिल्यानगर (49.85 कोटी थकबाकी).
- श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, पुणे (361.41 कोटी थकबाकी).
- राजगड सहकारी साखर कारखाना, पुणे (467.85 कोटी थकबाकी).
- सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, सोलापूर (199.94 कोटी थकबाकी).
Comments are closed.