दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले,पत्रकार परिषदेचंही सांगितलं

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) विलिनीकरणाची चर्चा आता थांबली असली तरी काही दिवसांपूर्वी पुन्हा नव्याने विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. अजूनही विलिनीकरण होऊ शकते असे राष्ट्रवादीतील काही वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अपेक्षा नेहमीच कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. यासंदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून कुणीही स्पष्टपणे बोलत नाही, विशेष म्हणजे पवार कुटुंबातील कोणीही बोलत नाही. मात्र, आता, अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहावं, असे जय पवार यांनी म्हटले.

विलिनीकरणासंदर्भात माझी वैयक्तिक भूमिका नाही. मी छोटा आहे, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ दादा असतील बाकीचे जेष्ठ नेते असतील ते ठरवतील. मला वाटतंय की आम्ही कुटुंब म्हणून सर्व एकत्र राहावं. जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले तेव्हा पवार कुटुंब एकत्र होते, आजही आम्ही एकमेकांशी बोलतो, असे म्हणत जय पवार यांनी विलिनीकरणाच्या चर्चेवर अधिक बोलणे टाळले. विलिनीकरण हा राजकारणातील भाग आहे, त्यावर मी जास्त संभाषण करणे मला योग्य वाटत नाही. यासंदर्भात पक्षातील वरिष्ठ नेते बोलतील, असे जय पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी

दरम्यान, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, शरद पवार साहेब सुद्धा आग्रह करत आहेत की, निवडणूक बिनविरोध व्हावी. बारामतीकरांना देखील वाटतंय की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी. दादांचं काम अनेक वर्ष सर्वांनी पाहिलं आहे, सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्याही मनात निवडणूक बिनविरोध व्हावी हीच भावना आहे, असेही जय पवार यांनी म्हटले.

जय पवार पत्रकार परिषदेबाबतही बोलले

जय पवार यांनी पत्रकार परिषद लांबणीवर पडण्याचं कारणही सांगितलं. पत्रकार परिषद न घेण्याचं काहीही कारण नाही, जे मुद्दे मला बोलायचे होते त्या मुद्द्यांमध्ये काही मुद्दे रोहित दादांनी ऑलरेडी सर्वांना सांगितले आहेत. मला जे मुद्दे बोलायचे होते ते पुन्हा कळालं की रोहित दादांनी ते कव्हर केले आहेत. मला वाटतंय आता जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही, तोपर्यंत मी उगीचच लोकांच्या मनात मतभेद करायला नाही पाहिजे. जे आम्हाला वैयक्तिक वाटतं ते वाटतं, पण जेव्हा फायनल अहवाल येईल तेव्हा मी तुमच्या सर्वांसमोर स्पष्टता देईल, असेही जय पवार यांनी स्पष्ट केले.

विलिनीकरणावर काय म्हणाले होते सुनिल तटकरे

अजित दादांच्या निधनानंतर लगेचच विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. मात्र, त्यावेळी मी बोलण्याच्या मानसिकतेत नव्हतो. बोललो असतो तर अश्रूंचा बांध आवरला नसता. ज्या पद्धतीनं ते सुरु झालं त्याचा राजकीय अर्थ लक्षात आला की, काहीतरी घडतंय. विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ आता दादा गेले आहेत आणि विलिनीकरण थांबलं तर विलिनीकरण नंतर होईल. विलिनीकरणाचा टोटल सिनॅरिओ बदलतो, असे सुनिल तटकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले होते. तसेच, आता माझा काही विलिनीकरणास विरोध होता असा भाग नाही. मला त्या गोष्टीची माहिती होती, असेही सुनील तटकरेंनी सांगितले. तसेच विलिनीकरण करू पण वहिनींना नेता निवडा असं त्यांच्यातील कोणी म्हटलं नाही, असेही तटकरेंनी म्हटलं होतं.

हेही वाचा

पुढचे 25 वर्ष देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री; जैन मुनींच्या वक्तव्यावरुन नितेश राणेंची नाराजी, शिवरायांबद्दलही बोलले

आणखी वाचा

Comments are closed.