राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, चर्चेसाठी येण्याची गरज; नेत्यांमध्ये खलबतं
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) विलिनीकरणाच्या चर्चेला आता जवळपास पूर्णविराम मिळाल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार यांनी थेट नाव घेऊन राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर हल्लाबोल आणि गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे, दोन्ही पक्षातील दरी आणखी खोल होत असली तरी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र आलं पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांची आहे, काही पदाधिकाऱ्यांची आहे. त्यातच, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, फक्त यासाठी सुनेत्रा पवारांशी (Sunetra Pawar) बोलायला हवं, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज 2 महिने पूर्ण झाल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये अजित दादांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. तसेच, दोन राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चाही याचनिमित्ताने पुढे येत आहे. राष्ट्रवादीतील विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, फक्त चर्चेची तयारी हवी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवारांशी चर्चा केली जाऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज आहे. सुनेत्रा पवारांशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वर्तुळात होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही पक्षाच्या विलीनकरणाच्या चर्चा सत्य आहेत. परंतु अजित दादांच्या मृत्यूनंतर परिस्थिती बदलली आहे. दादांचा परिवार बाहेर फेकला जातो की काय, अशी स्थिती निर्माण झाली म्हणून लवकर शपथविधीचा आग्रह जेष्ठ नेत्यांनी धरला होता. पवार कुटुंबियांना शपथविधीला आणण्यासाठीच पार्थ पवार त्यादिवशी प्रयत्न करत होते, परंतु कुणी आले नाहीत याविषयीची खंत सर्वांनाच असल्याचेही समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ वर्तुळातील सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, अजित पवारांच्या निधनाला तीन दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. तर, शपथविधी सोहळ्याबाबत आपणास काही माहिती नव्हती, असेही शरद पवारानी त्यावेळी म्हटले होते.
सुनेत्रा पवारांकडून अजित दादांची आठवण
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनीही आज अजित पवारांच्या निधनाला 2 महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आठवणी जागवत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ”दादा, आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते. तुमच्यातील लोकाभिमुख – विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली.”, अशा शब्दात सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.