अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे वाचलं
मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबाबाबाकडे (अशोक खरात) जाणाऱ्या राजकीय नेत्यांची आणि सनदी अधिकाऱ्यांची संख्या लक्षवेधी आहे. त्यातच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चक्क बाबा अशोक खरातचे सीडीआर जाहीर केले असून रुपाली चाकणकरांचे सर्वाधिक कॉल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही नेत्यांचीही नावे दमानिया यांनी घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. तसेच, लोकप्रतिनिधीच अशा बाबांकडे जात असतील तर हे चिंताजनक आहे. मी केवळ तीन देवस्थान ठिकाणी जातो, असेही त्यांनी सांगितलं.
शरद पवार यांनी आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली, त्यानंतर दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयावर भूमिका स्पष्ट केली. अशोक खरातपासून ते बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केलं. सध्या राज्यात सुरू असलेल्या अशोक खरात प्रकरणासंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मी 2-3 ठिकाणी जातो, पंढरपूरला पांडुरंग, तुळजापूरला तुळजाभवानीचं दर्शन घेतो. तसेच, निवडणुकीवेळी कान्हेरी गावात मारुतीचं दर्शन घेतो, पण त्याची जाहिरात करत नाही. आज राज्यात चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
खरात बाबानंतर आणखी बाबा आला, राज्यात बाबांची गर्दी झाली आहे. एका बाजूला शाहू-फुले-आंबेडकर म्हणायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी जातात हे चिंताजनक आहेत. कोणी किती फोन केले? हे माझ्या वाचनात आलं, त्यात अनेकांची नावं आहेत, त्यात राजकीय पक्षात स्थान भूषवणारे लोकही आहेत, असे म्हणत शरद पवारांनी नाव न घेता सीडीआरमधून समोर आलेल्या माहितीचा उल्लेख आपल्या पत्रकार परिषदेत केला.
पार्थ पवारांच्या प्रश्नावर स्मीतहास्य
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरुन पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेसंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. शरद पवारांनी स्मीतहास्य करत या प्रश्नावर उत्तर दिले. ”राजकारणात एक प्रकारची परिपक्वता लागते. ती पार्थ पवार यांच्यात कितपत आहे, हे आज मी सांगू शकत नाही”, असे म्हणत एकप्रकारे शरद पवारांनी पार्थ यांचे कान टोचले आहेत.
विलिनीकरणाच्या भविष्यातील चर्चेवत आता सांगता येणार नाही – पवार
आमच्या वतीने विलिनीकरणाची चर्चा जयंत पाटील करत होते, अजित पवार यांच्यासोबत ती चर्चा सुरू होती. आमच्या पक्षात ती चर्चा आता झाली नाही. याबाबत जयंत पाटील मला ब्रिफिंग करत होते, भविष्यात चर्चा होईल का? याबाबत आज सांगता येणार नाही. आता आपण पक्षाचं काम करत राहाव असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी विलिनीकरणाच्या प्रश्नावर दिली.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.