देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली ‘गुगली’
मुंबई : राज्याच्या क्रिकेट विश्वातील अग्रगण्य संस्था म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे एम.सी.सी निवडणुकांची रंगत वाढली आहे. शिवसेना नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची एमसीएच्या अध्यक्षपदी लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुसरीकडे विद्यमान एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, मंत्री आशिष शेलार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचा अजिंक्य नाईक यांच्या निवडीला विरोध आहे. मात्र, एमसीएच्या निवडणुकीत राजकारण नको, असे म्हणत मुंबईक विविध क्लबच्या सदस्यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील विविध क्लबच्या मेंबर्सनी भेट घेतली. मुंबईतील वाय.बी चव्हाण सेंटर येथे बुधवारी सायंकाळी 6 वाजता एमसीएच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे सदस्य भेटीसाठी आले होते. त्यावेळी, एमसीएच्या निवडणुकीत वाढता राजकीय हस्तक्षेप चुकीचा असून खेळाशी संबंधीत व्यक्तीच पुन्हा एकदा अध्यक्षपदी असावी, अशी विनंती मेंबर्सनी शरद पवार यांना केली. दरम्यान, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार मिलिंद नार्वेकर देखील यावेळी उपस्थित होते.
शरद पवारांनी बोलताना म्हटले की, मी कधीही एमसीएमध्ये राजकारण आणले नाही, हीच अपेक्षा मला आता देखील आहे. आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटमध्ये राजकारण केलं नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाही आणि ते क्रिकेटच्या बाजूने उभे राहतील, अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली. तसेच, क्रिकेटमध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले पाहिजे आणि ते देवेंद्र फडणवीस करतायत असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. त्यामुळे, शरद पवारांच्या बोलण्यातून अजिंक्य नाईक हेच पुन्हा एकदा एमसीएच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असतील अशा प्रकारचे संकेत देण्यात आल्याचं स्पष्ट दिसून आलं.
प्रताप सरनाईकांनीही घेतली शरद पवारांची भेट
मंत्री प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग हा ‘मुंबई क्रिकेट असोशिएशन’च्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे. त्यामुळे, या संघटनेतील पवारांचे असणारे राजकीय वर्चस्व पाहता सरनाईक यांनी शरद पवारांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र, आपण केवळ ‘दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. पण, या भेटीमागे क्रिकेटचं राजकारण असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! घरकुलासाठी लाच घेणाऱ्या 9 अधिकाऱ्यांवर कारवाई, थेट कार्यमुक्त, आदेश जारी
आणखी वाचा
Comments are closed.