तुम्हाला लंगोट घालायला कोणी शिकवली? वस्ताद 1 डाव राखून ठेवतो, महेश लांडगेंवर राष्ट्रवादीची टीका

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय आखाडा चांगलाच रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीचं महायुतीत तेढ निर्माण होणार का? अशी चर्चा रंगलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीनं आमदार पैलवान महेश लांडगेंनी (Mahesh Landge) थेट अंगावर घेण्याची भाषा वापरत, अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar)  कुस्तीचं आव्हान दिलं. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनेही समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांनी (Umesh Patil) आमदार महेश लांडगेंवर टीका केलीय.

तुमचा वस्ताद अजितदादा, त्यांनीचं तुम्हाला लंगोट घालायला शिकवली

तुमचा वस्ताद अजितदादा आहे अन त्यांनीचं तुम्हाला लंगोट घालायला शिकवली, तेव्हा कुठं तुम्ही पैलवान झाले. हे विसरु नका अन वस्ताद शेवटी एक डाव राखून ठेवतो असा इशाराही राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांनी दिला. अजित पवारांनी मंगळवारी भोसरीत येऊन भाजपच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं. त्यांनतर दुसऱ्याचं दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महेश लांडगेंनी अजित पवारांविरोधात शड्डू ठोकले. मी पैलवान आहे, कोणाला घाबरत नाही, मला अंगावर घेण्याची सवय आहे. अशी आक्रमक भाषा वापरली. मग मुख्यमंत्र्यांनी ये पब्लिक है, ये सब जाणती है. असं म्हणत लांडगेंना सबुरीचा सल्ला दिला.

दरम्यान, आता अजित पवारांच्या मल्लांनी लांडगे विरोधात आखाड्यात उडी घेत, तुमचा वस्ताद कोण? तुम्ही कोणामुळं पैलवान झाले? हे न विसरण्याचा सल्ला  दिला. तसेच वस्ताद शेवटी एक डाव राखून ठेवतो, असा इशारा देखील उमेश पाटलांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले होते महेश लांडगे?

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील विकासाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. याच वादातून आता भाजपचे भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय आहे, असे सांगत महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे अजितदादांविरोधात शड्डू ठोकला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने पिंपरी-चिंचवडचा विकास केला. पण या सगळ्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून होतो, असे महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. त्यामुळे आता यावरुन पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Mahesh Landge : भाजप आमदार महेश लांडगे प्रोटोकॉल तोडतात, त्यांना शहराध्यक्षांचं वावडं? पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडेच केली तक्रार

आणखी वाचा

Comments are closed.