अजित पवार प्रमुख नेत्यांना बैठकांची माहिती द्यायचे, पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

मुंबई : अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाच्या संदर्भात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना माहिती होती, अशी माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत 12 बैठका घेतल्या होत्या. अजित पवार एकटेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बैठक घेत होते. या बैठकीत अजित पवारांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यानं विलिनीकरणबाबत तुमच्या पक्षातील इतर नेत्यांना माहिती आहे का असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी अजित पवारांकडून माहिती देण्यात आली होती त्यानुसार प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे या दोन नेत्यांना माहिती होती.

दिल्लीतून एकदा का हिरवा कंदील आला की माझ्या पक्षातील एक आमदार सोडून सर्वजण माझ्यासोबत येतील, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. आपण विलिनीकरणाचा निर्णय 12 फेब्रुवारीला घेऊ असं अजित पवारांनी सांगितलं होतं, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यानं दिली आहे.

सर्वांना सर्व माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बड्या नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार  राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत प्रफुल पटेल, सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांना माहिती होती.दिवंगत नेते अजित पवार पक्षातील प्रमुख नेत्यांना विलीनीकरणाबाबत होत असलेल्या बैठकींची माहिती देत होते. त्यावर शरद पवारांच्या पक्षातील एका बड्या नेत्याने पटेल आणि तटकरे यांचं याबाबत मत विचारले असता अजितदादांनी त्या नेत्याला उत्तर देताना सर्वांना सर्व माहिती आहे. माझ्या पक्षाकडून मी सांगेल ते होईल असा शब्दही दिला होता, असं राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं म्हटलं.

दिल्लीतून एकदा का हिरवा कंदील आला की माझ्या पक्षातील एक आमदार सोडून सर्व मी सांगेल तिथे सह्या करतील, असंही दादांनी त्या बैठकीत सांगितल्याचं बड्या नेत्यानं म्हटलं.

दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळं विलिनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. काल मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. तर, सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना ब्रेक लागल्याचं स्पष्ट झालंय.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.